

राशिवडे : शेटकेवाडी (ता. राधानगरी) येथे जमिनीच्या वादातून एका कुटुंबातील सदस्यांना काठी व लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी चेहर्यावर चटणी, बुक्का फेकण्यात आला. याप्रकरणी राधानगरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी नियती रणजित भोसले (रा. कळंबा, ता. करवीर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
नियती भोसले त्यांच्या कुटुंबाचा शेत जमिनीसंदर्भात न्यायालयात खटला सुरू आहे. रणजित भोसले हे आई-वडील, बहीण व इतर कुटुंबीय या जमिनीत रोप लावण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी शंकर भाऊ भोगुलकर, भरत शंकर भोगुलकर, मनोहर शंकर भोगुलकर, सिद्धार्थ मनोहर भोगुलकर, सविता भरत भोगुलकर, वैशाली मनोहर भोगुलकर, श्रेयश भरत भोगुलकर आणि आकाश खांडेकर (सर्व रा. शेटकेवाडी, राधानगरी) हे आले. त्यांनी 'हे शेत आमचे आहे,' असे म्हणून संशयित आरोपींनी शिवीगाळ करत काठीने व लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी चेहर्यावर चटणी, बुक्का फेकण्यात आला. याप्रकरणी राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.