

कोल्हापूर : मोबाईलवरून युवतीची छेडछाड केल्याच्या संशयातून कोल्हापूर येथील संभाजीनगर आणि सांगलीतील सिव्हील हॉस्पिटल परिसरातील तरुणांच्या दोन गटांत जोरदार राडा झाला. त्यात दोन्ही गटांकडील तिघेजण जखमी झाले आहेत. दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्यादी दाखल केल्या आहेत. सांगलीतील 5 जणांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शिवाजी तम्मा चौगुले (वय 20, रा. पारिजात कॉलनी, सिव्हील हॉस्पिटलजवळ, सांगली) याच्या फिर्यादीनुसार आदित्य रणदिवे, ओंकार झांबरे (रा. कोल्हापूर), तर आदित्य अविनाश रणदिवे याच्या फिर्यादीवरून हर्षवर्धन विनोद कोंडेकर (रा. सिव्हिल हॉस्पिटलजवळ, सांगली), शिवाजी तम्मा चौगुले (रा. सांगली) यांच्यासह तीन अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ताराराणी चौक ते रेल्वे फाटक रोडवर एलेक्झा पार्कसमोर रस्त्यावर गुरुवारी (दि. 5) सायंकाळी ही घटना घडली. दोन्ही गटांत झालेल्या हल्ल्यात हर्षवर्धन विनोद कोंडेकर, सोहन उदय आवळे (रा. पारिजात कॉलनी, सांगली) व आदित्य रणदिवे (न्यू मोरे कॉलनी, संभाजीनगर, कोल्हापूर) जखमी झाले.
हर्षवर्धन कोंडेकर यांच्या नात्यातील युवतीला आदित्य रणदिवे मोबाईलवरून त्रास देत असल्याचा सांगलीतील एका गटाचा समज होता. त्याला समजावून सांगण्यासाठी सांगलीतील तरुण कोल्हापुरात आले होते. त्यांच्यात बोलणे सुरू असतानाच वादावादी झाली. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडले. प्रकरण हातघाईवर आले. पळापळ आणि एकमेकांचा पाठलाग करण्याचा प्रकार घडला.
दोन्हीही गटांकडून धारदार शस्त्रांचा वापर
दोन्हीही गटांकडून धारदार शस्त्रांचा वापर झाला. त्यात हर्षवर्धन कोंडेकर, सोहन आवळे (सांगली) आणि प्रतिस्पर्धी गटाचा आदित्य रणदिवे जखमी झाला. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी ही माहिती दिली.