

इचलकरंजी : पूर्ववैमनस्यातून येथील सूर्योदयनगर परिसरात दोन गटांत हाणामारी झाली. यामध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगारासह तिघेजण गंभीर जखमी झाले. नौशाद करीम मुजावर (वय 24, रा. स्वामी अपार्टमेंट), आयुब अहमद अत्तार (22, रा. केटकाळेनगर), सागर अमर शिकलगार (20, रा. शिकलगार वसाहत) अशी त्यांची नावे आहेत.
याप्रकरणी सुशांत अर्जुन रानमाळे (25, रा. इंदिरा कॉलनी) याने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी 22 जणांवर गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी 18 जणांना अटक केली. याची माहिती पो.नि. सचिन पाटील यांनी दिली.
सूर्योदयनगर येथे एका कट्ट्यावर नौशाद मुजावर, सागर शिकलगार, आयुब अत्तार व सुशांत रानमाळे हे चौघे सोमवारी रात्री बसले होते. त्यांच्यात तसेच प्रज्वल अशोक हळदकर (वय 22), युवराज मच्छिंद्र जाधव (29), अमरनाथ मच्छिंद्र जाधव (21) यांच्यात पूर्ववैमनस्य आहे. यातून हळदकर, जाधव या संशयितांसह 20 ते 22 जण दुचाकीवरून शिवीगाळ करीत आले व त्यांनी लाकडी दांडके, चाकू, दगड आदींनी हल्ला केला. यावेळी प्रशांत दिलीप कुर्हाडे (वय 32) याने आयुब अत्तार याच्या पाठीत धारधार चाकूने वार केला, तर प्रज्वल हळदकर, अमरनाथ जाधव यांच्यासह आलेल्या इतरांनी लाकडी दांडक्याने नौशाद मुजावर याला मारहाण केली.
सुशांत रानमाळे याने पलायन केले, तर मारहाणीत आयुब अत्तार हाही जखमी झाला. तिघेही गंभीर जखमी झाले असून, तिघांवर सांगली सिव्हिल इस्पितळात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने हालचाली करीत प्रज्वल हळदकर, युवराज जाधव, अमरनाथ जाधव, अनिल कासाप्पा कल्याणी (वय 25), उत्कर्ष विजय पाटील (24), चंद्रदीप किरण झुटाळ (20), अतुल नामदेव मोहिते (24), वेदांत दिलीप पोळ (22), युवराज हिंदुराव साठे (38), शिवम सुरेश कांबळे (30), पुंडलिक वामन बकरे (25), गणेश शिवानंद मोळे (24), जयंत अजित कांबळे (25), दुर्वांकर जयंत खारकांडे (22), साहिल सुनील शेवाळे (22), आकाश प्रकाश कांबळे (31), राजवर्धन सुरेश धामके (20) या 18 जणांंना पोलिसांनी अटक केली. सर्वांना न्यायालयासमोर हजर केले असता 6 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
या प्रकरणातील योगेश कारवे आणि मंगेश खांडेकर या अन्य दोघा संशयितांचा पोलिस शोध घेत आहेत. तसेच या प्रकरणात दोघा अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. जर्मनी गँगच्या नावाखाली खंडणी मागितल्याप्रकरणी जखमी नौशाद मुजावर याच्यावर यापूर्वी गुन्हा दाखल असल्याचेही पोलिसांनी सांगितले. अधिक तपास सहायक फौजदार आबिटकर करीत आहेत.