

इचलकरंजी : दुसर्या प्रभागातील उमेदवाराच्या समर्थकाकडून विरोधी उमेदवारासाठी पैसे वाटप होत असल्याच्या कारणावरून भाजपमधील दोन उमेदवारांमधील अंतर्गत वाद चिघळला. प्रचाराच्या मुद्द्यावरून दोन दिग्गजांमध्ये एकमेकांना बघून घेण्याची भाषा, अपशब्दांचा भडीमार तसेच समर्थकांत धक्काबुक्की झाली. यामुळे तणाव वाढला होता. हा प्रकार गांधी कँप परिसरात घडला. घटनेनंतर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
भाजपकडून वेगवेगळ्या प्रभागांतून निवडणूक लढवणार्या दोन उमेदवारांमध्ये पूर्ववैमनस्यातून वाद आहे. यातच विरोधी उमेदवारासाठी पैसे वाटप करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्याने कार्यकर्त्यांनी विचारणा केली. यावरून वाद चिघळला. यावेळी हत्यारेही काढण्यात आल्याची चर्चा होती. पोलिस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड, पो.नि. महेश चव्हाण, शिवाजीनगरचे पो.नि. शिवाजी गायकवाड फौजफाट्यासह दाखल झाले. राखीव दलाची कुमकही आली. पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या समर्थकांना पांगवले. मात्र, रात्री उशिरापर्यंत या प्रभागामध्ये मोठा बंदोबस्त तैनात होता.