

कोल्हापूर : अनेक वर्षे प्रलंबित असणारी शहराची हद्दवाढ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी होईल, असे खासदार धनंजय महाडिक यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढण्याचे वरिष्ठ पातळीवर ठरले आहे. फॉर्म्युला सेट झाला आहे. जिल्ह्यात सर्व आमदार महायुतीचे निवडून आले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष व महापौर भाजपचाच असेल, असेही ते म्हणाले. महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत भाजप व ताराराणी आघाडीचे 33 नगरसेवक होते. त्यानुसार 33 जागा लढवणारच. शिवाय आमचे 7 उमेदवार 500 मतांनी तर 16 उमेदवार 1000 मतांनी पराभूत झाले होते. यामुळे 81 प्रभागांच्या नव्या रचनेनुसार भाजपचे उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. शिवसेनेकडे 4 तर राष्ट्रवादीकडे 14 आणि काँग्रेसकडे 29 नगरसेवक होते. यातील काँग्रेसकडील 29 पैकी 10 ते 12 जागा भाजपला मिळतील, असेही खा. महाडिक यांनी सांगितले.
राहुल गांधी यांच्याकडून निवडणुकांमध्ये बोगस मतदान झाल्याचा आरोप चुकीचा आहे. खोटे आणि चुकीचे नरेटिव्ह सेट करण्याचा हा प्रकार आहे. त्यांनी माध्यमांसमोर दिखाऊपणा करण्याऐंवजी न्यायालयात दाद मागावी, असेही महाडिक म्हणाले.
नांदणी मठातील हत्तीण हा भावनिक विषय आहे. त्याचे राजकीय भांडवल करू नये. हत्तिणीला वनताराकडे देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा आहे. याबद्दल भाजपला दोष देणे चुकीचे आहे. हत्ती संदर्भात पत्र कोणी दिले हे सर्वांना माहिती असल्याचा टोला खा. महाडिक यांनी माजी खा. राजू शेट्टी यांना लगावला.
छत्रपती राजाराम महाराज विमानतळ नामकरणाचा ठराव दिल्ली दरबारी देशभरातील 60 प्रस्तावांसोबत प्रलंबीत असून त्यासाठीचा पाठपुरावा सुरू आहे. सध्याच्या रनवेत वाढ करून 1930 मीटरचा रनवे कार्यान्वीत करणे, 2300 पर्यंत वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु असून 64 एकर जमिनीचे अधिगृहण झाले आहे. यामुळे 180 ते 200 सीटर एअर बस, मुंबई-दिल्ली विमानसेवेसह आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण होऊ शकणार असल्याची माहिती खा. महाडिक यांनी दिली. कोल्हापूर रेल्वे सेवेचीही विविध विकासकामे अंतिम टप्प्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
कोल्हापूर विमानतळाच्या 3 हजार मीटर रनवेच्या सर्व्हेची मागणी मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली आहे. येत्या सहा महिन्यांत होईल. यामुळे कोल्हापूर विमानतळावर आंतरराष्ट्रीय सेवा उपलब्ध होतील. यात टर्मिनल बिल्डिंग, एरोब्रिज, ट्रेनिंक इन्स्टिट्यूट, फ्लाईंग क्लब अशा सोयी-सुविधांचा समावेश असणार आहे. भारतातून 1800 विमानांच्या खरेदीची ऑर्डर दिली आहे. आगामी तीन वर्षांत ही विमाने भारतात दाखल होणार असल्याचेही महाडिक म्हणाले.