

कोल्हापूर : कोल्हापूर शहराची हद्दवाढ गेल्या सहा दशकांपासून रखडलेली असून हा प्रश्न आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. 1 जानेवारी 2026 ते 31 मार्च 2027 या काळात जनगणना विभागाने जिल्हा, पालिका किंवा पंचायत क्षेत्रात कोणताही बदल न करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे 31 डिसेंबर 2025 पूर्वीच हद्दवाढ करा, अशी मागणी हद्दवाढ समर्थक कृती समितीने केली आहे. गुरुवारी समितीने महापालिका अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांना याबाबतचे निवेदन दिले.
यावेळी कृती समितीचे बाबा इंदूलकर म्हणाले, हद्दवाढ ही केवळ राजकीय मागणी नसून नागरिकांचा वैज्ञानिक द़ृष्टिकोनातून जगण्याचा मूलभूत हक्क आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारशींनुसार प्रत्येक नागरिकाला निवासाची आवश्यक जागा आणि सुविधा मिळायला हव्यात. मात्र सध्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत कोल्हापूर शहरात उपलब्ध जागा अपुरी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हा निर्णय पुढे ढकलणे म्हणजे नागरिकांच्या अधिकारावर गदा आणण्यासारखे आहे.
यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण, बाबा पार्टे, अशोक भंडारे, दिलीप देसाई, किशोर घाटगे आदींनी आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी हद्दवाढ झाली पाहिजे, अन्यथा पुढील पाच वर्षे हा प्रश्न रखडणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झालेली नसल्याचे महापालिकेने समितीला लेखी कळवले आहे. महापालिकेकडून हे लेखा पत्र घेण्यासाठी कृती समितीने दिवसभर रेटा लावला. त्यावेळी महापालिका प्रशासनाने तसे पत्र दिले. निवडणुकांच्या तारखा जाहीर नाहीत, जनगणनेची सुरुवात करायला अद्याप काही काळ आहे. असे पोषक वातावरण असतानाही हद्दवाढ होत नाही, याचे उत्तर पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार, खासदार व लोकप्रतिनिधींनी द्यावे, अशी मागणी समितीने केली. यावेळी रघुनाथ कांबळे, अॅड. प्रमोद दाभाडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.