कोल्हापूर : डेंग्यूच्या विविध तपासण्यांसाठी अनेक खासगी रुग्णालये आणि प्रयोगशाळांमध्ये 600 ते 1,100 रुपयांपेक्षा जास्त शुक्ल आकारले जाते; मात्र आरोग्य विभागात ही तपासणी पूर्णतः मोफत होते. रुग्ण डेंग्यूबाधित आढळला, तर त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात मोफत उपचार होतात. खासगी रुग्णालयातील खर्च 20 हजार रुपये ते 6 लाखांपर्यंतचा आहे. त्यामुळे नागरिकांनी डेंग्यूबाबत विशेष काळजी घेतली पाहिजे. डेंग्यूचा डंख छोटा असला, तरी उपचाराचा खर्च मोठा आहे.
डेंग्यूवरील उपचाराचा खर्च रुग्णाच्या स्थितीवर अवलंबून असतो. सौम्य लक्षणे असल्यास घरी उपचार आणि देखरेख करणे शक्य असते; परंतु गंभीर लक्षणे असणार्या रुग्णाला रुग्णालायात दाखल करावे लागते. रुग्णालयात दाखल झाल्यास तपासणी, औषधोपचार, बेड चार्च आदींचा खर्च असतो. हा खर्च 20 हजार रुपये ते त्याहून अधिक असू शकतो, असे डॉक्टरांनी सांगितले.
डेंग्यूवर कोणतेही विशिष्ट औषध नाही; परंतु लक्षणे कमी करण्यासाठी उपचार केले जातात. लक्षणानुसार औषधे दिली जातात. डेंग्यूमध्ये शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यास भरपूर द्रव पदार्थ पिणे महत्त्वाचे असते. प्लेटलेटस्ची पातळी खूपच कमी झाली, तर रुग्णाला प्लेटलेटस् चढवण्याची गरज भासू शकते.
ताप, थंडी, अंगदुखी असते तेव्हा डॉक्टर औषधे देऊन घरीच विश्रांती घेण्याचा सल्ला देतात. आजाराची लक्षणे बदलली की, डॉक्टर औषधांमध्ये बदल करतात. त्यासाठी तपासणी व उपचाराचा खर्च वाढतो.
गंभीर रुग्णावर अतिदक्षता विभागात उपचार केले जातात. व्हेंटिलेटरची देखील गरज भासते. औषधांचा खर्चदेखील वाढतो.