

कोल्हापूर : कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ, सर्किट बेंच स्थापन करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्याशीही याबाबत चर्चा झाली आहे, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्किट बेंच स्थापन करण्यासाठी निश्चितच लवकर निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळाशी बोलताना दिली.
कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन व खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक अॅड. व्ही. आर. पाटील, उपाध्यक्ष अॅड. तुकाराम पाडेकर, महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अॅड. महादेवराव आडगुळे, अॅड. धनंजय पठाडे, अॅड. शिवाजीराव राणे, अॅड. संपतराव पवार यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांची सकाळी उजळाईवाडी येथील विमानतळावर भेट घेऊन चर्चा केली.
अॅड. व्ही. आर. पाटील यांनी फडणवीस यांना निवेदन सादर केले. कोल्हापूरला खंडपीठ स्थापन होण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्यासमवेत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याची त्यांनी विनंती केली. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूरसह रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील वकील, पक्षकार चाळीस वर्षांपासून खंडपीठ, सर्किट बेंचच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगितले. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खा. धनंजय महाडिक, आ. शिवाजीराव पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, बार असोसिएशनचे सेक्रेटरी मनोज पाटील, संकेत सावर्डेकर उपस्थित होते.
कोल्हापूरला खंडपीठ, सर्किट बेंच स्थापन करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. कोल्हापूरला निश्चित सर्किट बेंच स्थापन होणार असल्याचे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले, मुख्य न्यायमूर्ती यांच्याशी आपली चर्चा झाली आहे. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल.