

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसाठीच्या शेंडा पार्क येथे राखीव ठेवण्यात आलेल्या जागेचा प्रश्न तत्काळ मार्गी लावला जाईल, असे महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी शुक्रवारी सांगितले. या जागेबाबतच्या सद्य:स्थितीची त्यांनी जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेतली.
मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच 18 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. सर्किट बेंचचे कामकाज जिल्हा न्यायालयाच्या जुन्या इमारतीत होणार आहे. याकरिता या इमारतीचे नूतनीकरण करण्यात येत आहे. दरम्यान, खंडपीठासाठी सुरू असलेल्या लढ्यादरम्यान खंडपीठ कृती समितीने 2018 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावेळी खंडपीठासाठी शेंडा पार्क येथील जागा राखीव ठेवण्याची सूचना त्यांनी केली होती.
त्यानूसार जिल्हा प्रशासनाने खंडपीठासाठी पहिला टप्पा म्हणून शेंडा पार्क येथील रि.स.नं. 604 मधील 6 हेक्टर 20 आर. आणि रि.स.नं. 589 मधील 2 हे.98.40 आर.अशी एकूण हे.9.18.40 आर. (सुमारे 24 एकर) जमीन निश्चित केली. निश्चित केलेली ही जमीन खंडपीठाला देण्यासाठी हस्तांतरण करण्याबाबतचा प्रस्ताव 2018 मध्ये राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर झाले. त्याचे प्रत्यक्ष कामकाजही सुरू होत असल्याने त्याच्या स्वतंत्र इमारतीची आवश्यकता निर्माण झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर महसूल विभागाचा अपर मुख्य सचिव म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर कोल्हापूर दौर्यावर आलेल्या खारगे यांनी याबाबतची माहिती घेतली. जिल्हाधिकारी अमोल येडगे, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी या जमीनीच्या सद्य:स्थितीची माहिती दिली. याबाबत शासकीय विश्रामगृहावर बोलताना खंडपीठासाठी जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याकरिता सादर केलेला प्रस्तावाला गती दिली जाईल. त्याद्वारे जागेचा प्रश्न तत्काळ मार्गी लावला जाईल, असेही खारगे यांनी सांगितले.