कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच हा कोल्हापूर, सांगलीसह सहा जिल्ह्यांच्या अस्मितेचा विजय आहे. वकील, पक्षकार आणि जनतेच्या सक्रिय सहभागामुळे कोल्हापूर सर्किट बेंचचे स्वप्न सत्यात साकारत आहे. त्यामुळे येत्या 17 ऑगस्टला कोल्हापूरला साजेशा अशा शाही आणि भव्य-दिव्य थाटात सर्किट बेंचचा शुभारंभ करण्याचा निर्धार सर्वपक्षीय खंडपीठ कृती समिती, जिल्हा बार असोसिएशनच्या बैठकीत सोमवारी करण्यात आला. शुभारंभासाठी येणार्या अतिथींच्या स्वागतासह गुढ्या उभारून कोल्हापूरकरांनी आनंदोत्सव साजरा करावा, असे आवाहनही करण्यात आले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा शुभारंभ रविवार, दि. 17 ऑगस्टला कोल्हापुरात होत आहे. या पार्श्वभूमीवर दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वपक्षीय खंडपीठ कृती समिती व कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन पदाधिकार्यांची सोमवारी सायंकाळी ‘पुढारी भवन’ येथे व्यापक बैठक झाली. सर्वपक्षीय खंडपीठ कृती समिती व जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने यावेळी माजी महापौर आर. के. पोवार, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. महादेवराव आडगुळे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापूर खंडपीठ चळवळीचे प्रेरणास्थान डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना डॉ. प्रतापसिंह जाधव म्हणाले, सरन्यायाधीश भूषण गवई, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक अराधे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे कोल्हापूर सर्किट बेंचला मंजुरी मिळाली आहे. यानिमित्ताने कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांच्या विकासाचे पर्व सुरू झाले आहे. सरन्यायाधीश गवई, मुख्य न्यायमूर्ती आलोक अराधे दि. 17 ऑगस्टला होणार्या शुभारंभ सोहळ्याला स्वत: उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे कोल्हापूरला साजेशा शाही थाटात, भव्य-दिव्य वातावरणात शुभारंभ सोहळा होण्यासाठी समाजातील सर्वच घटकांनी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले.
ज्येष्ठ विधिज्ञ महादेवराव आडगुळे म्हणाले, कोल्हापूर खंडपीठासाठी 50 वर्षे अखंड लोकलढा सुरू आहे. कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील लोकलढ्याला डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे पाठबळ मिळाले. किंबहुना, डॉ. जाधव यांच्या पाठपुराव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला. सर्किट बेंच झाले, आता कोल्हापूर खंडपीठासाठी डॉ. जाधव यांनी पाठपुरावा करावा. त्यांच्यामुळेच भविष्यात खंडपीठाचेही स्वप्न साकार होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. माजी महापौर व सर्वपक्षीय खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार म्हणाले, कोल्हापूर शहरासह जिल्ह्याशी निगडित सर्वच विकासाच्या प्रश्नांत डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे योगदान राहिले आहे. खंडपीठासाठी डॉ. जाधव यांनी स्वत:ला झोकून घेतले होते. त्यामुळेच कोल्हापूरचे स्वप्न सत्यात उतरले आहे. येत्या दोन-तीन वर्षांत कोल्हापूर खंडपीठ सुरू झाले पाहिजे, यासाठी डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पुढाकार घ्यावा, अशी कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांच्या वतीने, कृती समितीच्या वतीने विनंती करीत आहोत, असेही त्यांनी आवाहन केले.
कॉ. सतीशचंद्र कांबळे म्हणाले, डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या सक्रिय सहभागामुळे कोल्हापूर खंडपीठ, सर्किट बेंचला चालना मिळाली आहे. 17 ऑगस्टला शुभारंभाचा सोहळा भव्य-दिव्य ठरावा, समाजातील सर्वच घटकांचे त्यामध्ये योगदान असावे, असेही त्यांनी आवाहन केले. डॉ. जाधव यांच्या पुढाकारातून शहर, जिल्ह्यातील अनेक महत्त्वाकांक्षी प्रश्नांना शासन दरबारी न्याय मिळाला आहे. कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. व्ही. आर. पाटील म्हणाले, डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्यामुळे कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील तरुण वकिलांना नव्याने करिअर घडविण्याची संधी मिळणार आहे. दैनिक ‘पुढारी’च्या माध्यमातून आयोजित कार्यशाळेचा ग्रामीण भागातील तरुण वकिलांना मोठा फायदा होणार आहे. खंडपीठाच्या लढ्यात डॉ. जाधव यांचे योगदान कौतुकास्पद ठरले आहे. डॉ. जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार शुभारंभाचा शाही सोहळा होईल, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. प्रशांत चिटणीस म्हणाले, कोल्हापूर खंडपीठ, सर्किट बेंचमुळे शहराच्या वैभवात भर पडणार आहे. भविष्यात विकासाला मोठा वाव मिळणार आहे. रोजगाराची साधने उपलब्ध होणार आहेत. डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्यामुळे कोल्हापूर शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे, असेही ते म्हणाले. यावेळी झालेल्या चर्चेत अॅड. बाबा इंदुलकर, महेश जाधव, दिलीप देसाई, अनिल घाटगे, किशोर घाटगे, शिवसेना नेते विजय देवणे, अॅड. तुकाराम पाडेकर, अॅड. मनोज पाटील, सूरज भोसले, अॅड. प्रमोद दाभाडे, मनीषा सातपुते, मीना पाटोळे, वैष्णवी कुलकर्णी, हंसिका जाधव, वैभव पाटील, प्रीतम पातले, स्वप्निल कराळे, निखिल मुदगल आदी सहभागी झाले होते.
अॅड. बाबा इंदुलकर म्हणाले, कोल्हापूरसह जिल्ह्यातील रिक्षा व्यावसायिकांवर दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे उपकार आहेत. डॉ. जाधव यांच्या पुढाकारातून रिक्षा व्यावसायिकांना तब्बल 85 लाख रुपये किमतीची इलेक्ट्रॉनिक मीटर मोफत बसविली गेली. शिवाय, रिक्षा संघटनेच्या नावावर 9 लाखांची ठेवही बँकेत सुरक्षित राहिली आहे. समाजातील कष्टकर्यांसह असंघटित घटकांसाठी डॉ. जाधव यांचे कार्य आदर्शवत राहिले आहे. डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्यामुळेच कोल्हापूरला खंडपीठ होत आहे. याचा आम्हाला अभिमान आहे.
भाजपचे नेते महेश जाधव म्हणाले, राजकीय पक्ष कोणताही असो. सामान्य कार्यकर्त्याला सत्तेत संधी मिळावी, ही दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांची कायम भूमिका असते. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे मानाचे आणि प्रतिष्ठेचे पद मिळाले. माझी निवड जाहीर होण्यापूर्वी डॉ. जाधव यांनी आपले अभिनंदन करून निवडीची गोड बातमी दिली होती. डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे माझ्यासह सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांवर उपकार आहेत.
शिवसेनेचे नेते विजय देवणे म्हणाले, दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव जे बोलतात ते करून दाखवितात. कोल्हापूरच्या अनेक प्रश्नांच्या सोडवणुकीमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. कोल्हापूर खंडपीठासाठी शासन आणि आंदोलक यांच्यात समन्वय घडविण्यासाठी त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. सामाजिक चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी बळ आणि आधार दिला आहे. डॉ. जाधव यांच्या कार्याचे समाजाकडून निश्चित मूल्यमापन होईल, असेही ते म्हणाले.
कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. प्रशांत चिटणीस म्हणाले, माझ्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील लढ्याला गती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठकाही झाल्या. डॉ. जाधव यांनी एखाद्या विषयाला स्पर्श केला की त्याचे सोने होते. खंडपीठ, सर्किट बेंचच्या यशात डॉ. जाधव यांचा मोठा वाटा आहे. डॉ. जाधव यांच्यामुळे सहा जिल्ह्यांना न्याय मिळणार आहे.