

प्रवीण मस्के
कोल्हापूर : तब्बल साडेचार दशकांच्या सातत्यपूर्ण लढ्याला यश आले आणि अखेर कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन झाले. हा फक्त एक प्रशासकीय निर्णय नसून, कोल्हापूरसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रासाठी सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल, असा ऐतिहासिक क्षण आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर हे स्वप्न साकारले असून कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता, वकील व पक्षकारांचा प्रचंड भार हलका होण्याची शक्यता आहे. आता त्यांना मुंबई किंवा औरंगाबादला जाण्याचा त्रास होणार नाही. वेळ, पैसा व श्रम याची बचत होऊन न्यायप्रवेश अधिक सुलभ व वेगवान झाला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्यालय मुंबईत असून छत्रपती संभाजीनगर व नागपूर येथे आधीच खंडपीठे आहेत. पश्चिम महाराष्ट्र, कोकण व मराठवाडा या भागातील नागरिकांना न्यायालयीन कामकाजासाठी हजारो कि.मी. दूरवरचा प्रवास करावा लागत होता.
अनेकदा धरणे, मोर्चे, आंदोलने, उपोषणे अशा विविध माध्यमांतून शासनावर दबाव आणण्यात आला. परंतु, प्रत्येक वेळी आश्वासने मिळूनही निर्णय पुढे ढकलला गेला. या संघर्षाला माध्यमांनी साथ दिली. विशेषतः दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी संपादकीय, बातम्या व लोकजागृतीच्या माध्यमातून या प्रश्नाला सतत जिवंत ठेवले. खंडपीठाची चळवळ कोल्हापूरच्या जनआंदोलनाचे स्वरूप घेऊ शकली, त्यामागे त्यांचे मोलाचे योगदान आहे. उद्घाटन सोहळ्यात दस्तरखुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या खंडपीठ आंदोलनातील कार्याचा गौरव केला.
कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे सर्किट बेंचचे रविवारी (दि.17) भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन झाले. हा दिवस कोल्हापूरकरांसह सहा जिल्ह्यांतील जनतेच्या अभिमानाचा ठरला. उद्घाटन सोहळ्यात सरन्यायाधीश गवई यांनी आतापर्यंतचे सर्वात जास्त वेळ (53 मिनिटे) भाषण करून कोल्हापूरकरांनी दिलेल्या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सर्किट बेंचची स्थापना हा केवळ कोल्हापुरांचा नव्हे, तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा विजय आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर लोकशाहीतील न्यायप्रवेशाचा उजेड दाराशी पोहोचला आहे.
सरन्यायाधीश गवई यांचे दीर्घ भाषण केवळ औपचारिक नव्हते, तर कोल्हापूरकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादास दिलेली दाद होती. त्यांच्या प्रत्येक शब्दातून कोल्हापूरच्या खंडपीठाच्या न्याय्य लढ्याचा गौरव झळकला. जनतेने केलेले आदरातिथ्य व आत्मियता यांनी हा सोहळा अधिकच संस्मरणीय बनवला. जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद, वकिलांचा आनंद व उपस्थितांच्या डोळ्यांतील आनंदाश्रू या ऐतिहासिक क्षणाचा आनंद प्रत्येकाच्या चेहर्यावर ओसंडून वाहत होता.
* न्यायालयीन प्रकरणांचा निपटारा जलदगतीने व्हावा
* न्यायमूर्ती, वकिलांसाठी आवश्यक सुविधा मिळाव्यात
* न्यायालयीन कामकाज तंत्रज्ञानाधारित व पारदर्शक व्हावे
* वकील, पक्षकारांसाठी पार्किंग, वाहतूक नियोजन करावे