कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने 4 डिसेंबरला शहरातील रस्तेप्रश्नी झालेल्या सुनावणी दरम्यान रस्ते, फुटपाथवरील अतिक्रमणे हटवून रस्ते वाहतुकीसाठी मोकळे करा, असा आदेश महापालिकेला दिला होता. या आदेशाने महापालिका खडबडून जागी झाली असून सोमवारी चिमासाहेब चौक ते खानविलकर पेट्रोल पंप मार्गावरील अतिक्रमणावर कारवाई करत फ्रंटमार्जिनमधील 12 दुकानगाळ्यांवर हातोडा मारला.
कोल्हापूर शहरातील रस्तेप्रश्नी कांही नागरिकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने फुटपाथ, रस्ते यामधील अडथळे दूर करा, अशी सूचना केली होती. त्यानुसार महापालिकेने सोमवारी सकाळी अकरा वाजता चिमासाहेब चौक ते ट्रॅफिक ऑफिस रस्त्यावर कारवाईला सुरुवात केली. या मार्गावर फ्रंट मार्जिनमध्ये काही मिळकतधारकांनी दुकानगाळे बांधून ते भाड्याने दिले होते. महापालिकेच्या नगररचना विभागाने संबधितांना दीड महिन्यापूर्वी नोटीस देऊन कारवाईचा इशारा दिला होता. तरीदेखील ही अतिक्रमणे कुणीच काढून घेतली नव्हती.
सोमवारी सकाळी महापालिकेचे नगररचना विभाग, पवडी विभाग, अतिक्रमण निर्मूलन विभागाची पथके जेसीबी मशिन, डंपर, कर्मचाऱ्यांच्या फौजफाट्यासह याठिकाणी गेले आणि त्यांनी अतिक्रमण काढायला सुरुवात केली. सुरुवातीला तुम्ही नोटीस न देताच कारवाई का करत आहात, नोटीस का दिली नाही, अशी भूमिका मिळकतीमधील काही कुळांनी घेतली. परंतु महाालिकेच्या अधिकाऱ्यांनी नोटीस पाठविली आहे, असे सांगितले. त्यानंतर दुकानातील साहित्य हलविण्यासाठी या कुळांची धावपळ सुरू झाली.
महापालिकेच्या पथकांनी मात्र बांसुरी हॉटेलच्या अलीकडील गाळ्यापासून कारवाईला सुरुवात केली. त्यानंतर बांसुरी हॉटेलच्या पत्र्याच्या शेडसह लगतचे दहा ते बारा दुकानगाळे जेसीबी मशिनने उद्ध्वस्त केले. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने मोठी वाहतूक कोंडीही होती. महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी सकाळी प्रत्यक्ष जागेवर जाऊन अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उपायुक्त विजयकुमार धनवाडे, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता सुरेश पाटील, अभियंता अरुण गवळी आदी उपस्थित होते.