Accident News | चुयेतील तरुणावर काळाचा घाला; देशसेवेचे स्वप्न अधुरे
चुये : सैन्य दलात भरती होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या चुये (ता. करवीर) येथील प्रज्वल दिलीप पाटील (वय 20) या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला. सैन्य भरतीच्या मैदानी परीक्षेच्या तयारीसाठी कोल्हापूरला जात असताना कात्यायनीजवळ झालेल्या भीषण अपघातात त्याचा मृत्यू झाला. यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
प्रज्वल हा चुलते तानाजी पाटील यांच्यासोबत मोटारसायकलवरून कोल्हापूरकडे निघाला होता. कात्यायनीनजीक प्रभूनाथ मठासमोर पाठीमागून भरधाव आलेल्या कारने (एमएच 12 एनबी 1373) त्याच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या धडकेत प्रज्वलच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठा रक्तस्राव झाला, तर चुलते तानाजी पाटील हेदेखील जखमी झाले. प्रज्वलला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान शनिवारी सकाळी त्याची प्राणज्योत मालवली.
प्रज्वलने नुकतीच बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती आणि सैन्य भरतीची लेखी परीक्षाही यशस्वीपणे दिली होती. त्याच्या निधनामुळे पाटील कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या मागे आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे. अपघाताची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली आहे.

