Karnataka accident: चित्रदुर्गजवळ कार अपघातात यरनाळ येथील चालक ठार ; गावावर शोककळा
निपाणी : चित्रदुर्ग-कलबुर्गी मार्गावर झालेल्या कोल्हापूर येथील लाचलुचपत विभागाच्या पोलीस उपायुक्त वैष्णवी पाटील यांच्या कारला झालेल्या अपघातातील चालक राकेश अर्जुन ऐवाळे (वय ४० रा.यरनाळ, ता. निपाणी) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे यरनाळ गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, मयत राकेश ऐवाळे हे गेल्या अनेक वर्षापासून वैष्णवी पाटील यांच्या कारवर चालक म्हणून सेवेत होते. दरम्यान ते चार दिवसापूर्वी वैष्णवी पाटील यांच्या कुटुंबियासमवेत देवदर्शनासाठी चित्रदुर्ग परिसरात गेले होते. तेथून परतत असताना त्यांच्या कारला चित्रदुर्ग-कलबुर्गी मार्गावर रविवारी (11 जानेवारी) सकाळी अपघात झाला. या अपघातात राकेश ऐवाळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मयत राकेश ऐवाळे हे अत्यंत मनमिळाऊ व हळव्या स्वभावाचे होते. त्यांनी मित्रपरिवार व गोतावळा मोठ्या प्रमाणात निर्माण केला होता. या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन जुळी मुले, आई, वडील, दोन विवाहित बहीणी असा परिवार आहे. त्यांचे वडील अर्जुन ऐवाळे हे सेवानिवृत्त शिक्षक असून त्यांना अपघातात आपल्या एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने मोठा धक्का बसला असून राकेशच्या जाण्याने ऐवाळे कुटुंब पोरके झाले आहे.

