

जयसिंगपूर : चिपरी (ता. शिरोळ) येथे कोमल ऊर्फ कीर्ती किशोर आवळे (वय 27, रा. चिपरी, ता. शिरोळ) या विवाहितेने अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेऊन जीवन संपवल्याची घटना गुरुवारी रात्री घडली होती; मात्र कोमल हिने सासरच्या छळाला कंटाळून जीवन संपवल्याची फिर्याद कुमार आदगोंडा कांबळे (रा. आळते, ता. हातकणंगले) यांनी जयसिंगपूर पोलिसांत दिली आहे.
या विवाहितेच्या जीवन संपवण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पती किशोर पट्टू आवळे, सासू शोभा पट्टू आवळे, दीर अतुल पट्टू आवळे व जाऊ कोमल अतुल आवळे (सर्व रा. चिपरी, ता. शिरोळ) यांच्या विरोधात जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
कोमल आवळे या विवाहितेने चिपरी येथे गुरुवारी रात्री अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतल्याची घटना घडली होती. उपचारासाठी यांना सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान रात्री 12 च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला होता. याबाबतची नोंद जयसिंगपूर पोलिसांत झाली होती. दरम्यान, तुला मूल होत नाही. तू वांझोटी आहेस. किशोरचे दुसरे लग्न करतो असे म्हणून पती, सासू, दीर व जाऊ यांच्याकडून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला जात होता, असेही फिर्यादित म्हटले आहे. जयसिंगपूर पोलिसांनी शुक्रवारी रात्री पती, सासूसह चौघांना अटक केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक युनुस इनामदार करीत आहेत.