चिंचवाड येथे बर्निंग केएमटी बसचा थरार

बस जळून खाक; जीवितहानी नाही
Kolhapur Crime News
कोल्हापूर ः चिंचवाड येथे केएमटी बस आगीमुळे जळून खाक झाली.
Published on
Updated on

गांधीनगर : केएमटी बस सुरू करताना अचानक शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याने चिंचवाडवासीयांनी बर्निंग बसचा भीषण थरार अनुभवला. या आगीत बस खाक झाली असून, सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले. बसमधील प्रवासी वेळीच उतरल्याने जीवितहानी टळली. ही घटना चिंचवाड (ता. करवीर) येथे ग्रामपंचायत चौकात बुधवारी दुपारी 12.45 वाजण्याच्या सुमारास घडली.

बुधवारी बारा वाजताची गंगावेस ते चिंचवाड ही बस (एम.एच. 09 सीव्ही 0394) विद्यार्थी व प्रवासी घेऊन चिंचवाड येथे पोहोचली. प्रवासी उतरल्यानंतर दहा मिनिटांनी काही प्रवासी कोल्हापूरला जाण्यासाठी बसमध्ये बसले. चालक संतोष बुचडे यांनी स्टार्टर मारला; पण अचानक इंजिनमधून धूर येऊ लागला. ही घटना रिक्षाचालक इम्तियाज शेख यांनी पाहिली. त्यांनी तत्काळ बसचालकाला याबाबत माहिती दिली. चालक-वाहकाने बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना तत्काळ खाली उतरवले. चालक बुचडे यांनी खाली उतरून पाहिले असता शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे त्यांच्या लक्षात आले. बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले. आगीने संपूर्ण बसला ज्वालांनी घेरून टाकले. शेजारी असलेल्या चावीच्या पाण्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न झाला; पण तो निरर्थक ठरला.

सरपंच श्रद्धा प्रशांत पोतदार, पोलिसपाटील रवी कांबळे, उपसरपंच धन्यकुमार पाटील, ग्रामपंचायत सदस्य राहुल सरकार, दीपक मगदूम यांच्यासह काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यासाठी परिसरातील घरांतून घेतलेल्या पाण्याचा वापर केला; पण आग आटोक्यात येत नव्हती. रवी कांबळे यांनी अग्निशमन दल तसेच पोलिस प्रशासनाला याबाबत कळवले. कोल्हापूर महानगरपालिकेचे अग्निशमन दल आणि गांधीनगरचे सहायक पोलिस निरीक्षक सागर वाघ काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले. केएमटीचे अधीक्षक नितीन पवार, वाहतूक निरीक्षक सुनील जाधव, वर्क मॅनेजर दीपक पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news