कोल्हापूर : देशाच्या सीमेवर घुसखोरी करून चिंताजनक वातावरण निर्माण करणार्या चीनने अर्थव्यवस्थेचा उसळणारा वारू रोखण्यासाठी आता भारतीय बाजारपेठेला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये दैनंदिन वापराच्या वस्तू कमी दरात उपलब्ध करून भारतीय बनावटीच्या उत्पादनांपुढे मोठे संकट निर्माण केले जात असतानाच आता औषध उद्योगासाठी लागणार्या कच्च्या मालाच्या किमतीत प्रचंड कपात करून भारतीय उद्योगापुढे आव्हान उभे केले आहे.
जगात औषधांसाठी लागणार्या कच्च्या मूलद्रव्यांच्या (एपीआय) निर्मितीत चीन हा सर्वात मोठा खेळाडू म्हणून ओळखला जातो. तुलनेने कमी किमतीत औषधी मूलद्रव्यांचे उत्पादन करून चीनने जगातील अनेक देशांतील या क्षेत्रातील उद्योगांना कुलूप लावणे भाग पाडले होते. यामुळे औषध निर्मितीसाठी भारताचे चीनवर मोठे अवलंबित्व होते. हे कमी करण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या काही वर्षात पावले उचलली. या क्षेत्रातील उद्योगांना आर्थिक मदतीसह प्रोत्साहन दिले. यामुळे भारतात हे क्षेत्र नव्याने उभारत असताना चीनने एक नवी खेळी खेळली आहे. यामध्ये मूलद्रव्यांच्या किमतींचा आलेख झपाट्याने घटविला आला आहे. या किमती 30 टक्क्यांपासून 70 टक्क्यांपर्यंत घटविल्या आहेत.
चीनमध्ये कमी झालेल्या औषधांच्या किमतीत पेनिसिलीन या प्रतिजैविकाची किंमत 46 टक्क्यांनी घसरली आहे. पॅरासिटामॉलची किंमत 53 टक्क्याने, उच्च रक्तदाब नियंत्रणासाठी अॅम्लोडिपिन व टेल्मिसार्टन या मूलद्रव्यांच्या किमती प्रत्येकी 60 टक्क्यांनी तर मधुमेहावरील मेटफॉर्मिन व सिटाग्लिप्टिन या मूलद्रव्यांच्या किमती अनुक्रमे 29 व 72 टक्क्यांनी घसरल्या आहेत. त्यामुळे भारतीय औषध कंपन्यांचा कल चीनमधून कच्चा माल खरेदी करण्याकडे वाढला आहे.
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी एका मुलाखतीत चीनचे भारतापुढे मोठे आव्हान असल्याचे सूतोवाच केले होते. गेल्या काही वर्षांत चीनने भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात शिरकाव केला. वस्तूंचा दर्जा न पाहता, भारतीय ग्राहकांनी त्या खरेदी केल्या आणि त्यातून बक्कळ पैसा चीनने मिळवला. भारताविरुद्ध चीन क्षणोक्षणी कुरघोड्या करत असताना भारतीय ग्राहक मात्र चिनी बनावटीच्या वस्तू खरेदी करून त्यांना अप्रत्यक्ष हातभार लावत असल्याचे चित्र आहे.