

कोल्हापूर : दानेवाडी (ता.पन्हाळा) येथील फार्महाऊसवर लहान मुलासोबत झालेल्या वादावादीचा राग मनात धरून घरात घुसून संसारोपयोगी साहित्याची तोडफोड व शिवीगाळ, धक्काबुक्की केल्याप्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात वडणगे (ता.करवीर) येथील १४ जणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमृता शिवाजी तेलवेकर (वय ३७,रा. वडणगे,करवीर) यांच्या फिर्यादीनुसार विशाल संदीप खडके, ऋषिकेश राजू पाटील, विनायक गणेश साळोखे, विकास मारूती पाटील, विशाल सांगोळे, ओम सांगोळे, प्रेम कांबळे, प्रणव कांबळेसह ५ अनोळखी अशा एकूण १४ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी तेलवेकर यांच्या घरातील तसेच गावातील मुले दानेवाडी (ता. पन्हाळा) येथील फार्महाऊसवर गेले होते. यावेळी मुलामध्ये वादावादी झाली. त्याचा राग मनात धरून दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने संशयितांनी बेकायदा जमाव केला. हातात काठ्या, लोखंडी रॉड घेवून फिर्यादीसह तुमच्या मुलांना सोडणार नाही. तुम्ही गावात रहायचे नाही,अशी धमकी देत शिवीगाळ केली.
गल्लीतील फय्याज मकानदार यांच्या घरात घुसून त्यांची आई रेश्मा मकानदार, वडिल चाँद मकानदार यांना शिवीगाळ करीत घरातील प्रापंचिक साहित्याची तोडफोड करून नुकसान केले. बुधवारी (दि.१५) सायंकाळी घडलेल्या घटनेची शनिवारी सायंकाळी करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. संशयितांना लवकरच अटक करण्यात येईल, असे करवीर पोलिस ठाण्यातून सांगण्यात आले.