Kolhapur | बालकावर लैंगिक अत्याचार; नराधमाला 20 वर्षे कारावास

राजारामपुरी येथील माणुसकीला काळिमा फासणारी घटना; 10 हजारांचा दंड
child sexual assault case
Kolhapur | बालकावर लैंगिक अत्याचार; नराधमाला 20 वर्षे कारावास
Published on
Updated on

कोल्हापूर : अरबीसह उर्दूच्या शिक्षणासाठी येणार्‍या आणि तिसरीत शिक्षण घेणार्‍या दहा वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार करणार्‍या यादवनगर येथील नराधमाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती कविता बी. अग्रवाल यांनी गुरुवारी 20 वर्षे सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये दंड ठोठावला. मुहम्मदतल्हा मुस्तफा शेख (वय 27, रा. मदिना मश्जिदजवळ, यादवनगर, कोल्हापूर) असे आरोपीचे नाव आहे. दि. 18 नोव्हेंबर 2021 मध्ये साक्षीदाराच्या घरात हा प्रकार घडला होता.

माणुसकीला काळिमा फासणार्‍या या घटनेवर राजारामपुरी परिसरात तीव— पडसाद उमटले होते. लैंगिक अत्याचाराच्या घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही आरोपीने शाळकरी मुलाला दिली होती. भेदरलेल्या अवस्थेत मुलाने हा प्रकार पालकांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर मुलाच्या वडिलांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. राजारामपुरीसह परिसरातील महिला, सेवाभावी संस्थांसह संतप्त नागरिकांनी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांची भेट घेऊन आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली होती. राजारामपुरी पोलिसांनी आरोपी मुहम्मदतल्हा मुस्तफा शेख याच्या मुसक्या आवळून त्याला बेड्या ठोकल्या होत्या. सहायक पोलिस निरीक्षक डी. टी. जौंजाळ यांनी मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा तपास करून नराधमाविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

शेख हा लहान मुलांना अरबी व उर्दूचे शिक्षण देत होता. राजारामपुरी येथील दौलतनगर, भगतसिंग गल्ली येथील साथीदाराच्या घरातील दुसर्‍या माळ्यावर खोलीत मुलांचे वर्ग घेत होता. दि. 18 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी साडेसहाला नराधमाने पीडित शाळकरी मुलावर लैंगिक अत्याचार केले. ही घटना घरात कोणाला सांगितली तर तुला शिकविणार नाही, अशी धमकी देत जीवे मारण्याचीही त्याने भीती घातली. आरोपीच्या कृत्यामुळे भेदरलेल्या मुलाने शिकवणीसाठी जायचे बंद केले. वडिलांनी मुलाला जाब विचारताच या क्रूर घटनेचा भांडाफोड झाला. दरम्यानच्या काळात परिसरात वार्‍यासारखी ही बातमी पसरली. नराधमाविरोधात संतापाची लाट उसळली. राजारामपुरी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वेळीच पावले उचलली. नराधमाला तत्काळ बेड्या ठोकल्या.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती कविता अग्रवाल यांच्यासमोर खटल्याची सुनावणी सुरू झाली. सरकार पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील अ‍ॅड. सुजाता एस. इंगळे यांनी कामकाज पाहिले. खटल्यात सहायक सरकारी वकिलांनी आठ साक्षीदार तपासले. अ‍ॅड. इंगळे यांनी केलेला युक्तिवाद, त्यासोबत न्यायालयात मांडलेले वरिष्ठ न्यायालयातील न्यायनिवाडे, प्रत्यक्ष दाखल पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी मुहम्मदतल्हा शेख याला दोषी ठरविले.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती कविता अग्रवाल यांनी आरोपी मुहम्मदतल्हा शेख याला भारतीय दंडविधान कलम 377, तसेच पोक्सो कलम 4, 6, 5 (एम) आणि ज्युवेनाईल जस्टीस अ‍ॅक्ट 2015 चे कलम 75 नुसार 20 वर्षे सक्तमजुरी, 10 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद, अशी शिक्षा ठोठावण्यात आली. शाळकरी मुलावर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या खटल्याच्या निकालाकडे राजारामपुरीसह शहराचे लक्ष लागले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news