उजळाईवाडी / कोल्हापूर : चॉकलेट देण्याच्या बहाण्याने चार वर्षाच्या चिमुरडीवर नराधमाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी करण कुंवर (२५, रा. गोकुळ शिरगाव, मूळ आसाम) याला अटक केली. पीडितेच्या आईने गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीत कंपनीत काम करणार्या करणसह परप्रांतीय कामगार आवारातच राहतात. याच परिसरात पीडितेचे कुटुंब राहते. दुपारी पीडितेस करणने चॉकलेटच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेऊन अत्याचार केला. भेदरलेल्या अवस्थेत ती घरी आली. आईसह तिच्या कुटुंबीयांनी ११२ हेल्पलाईन नंबरला घटनेची माहिती दिली. सहायक पोलिस निरीक्षक रणजित पाटील यांनी करणला ताब्यात घेतले. संशयित करण आणि पीडित कुटुंब हे मूळचे आसामचे आहे. त्याचे पीडिताच्या घरी येणे-जाणे होते. पीडिता त्याच्या अंगाखांद्यावर खेळल्याचे सांगण्यात आले.