

कोल्हापूर : भरधाव वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वाराची कोल्हापूरकडे जाणार्या एसटीला जोरात धडक झाल्याने उरुण ईश्वरपूर (जि. सांगली) येथील दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर युवतीसह तरुण गंभीर जखमी झाला. दिग्विजय दिलीप पाटील (39, रा. मंत्री तालीमजवळ, ब्राह्मणपुरी, उरुण ईश्वरपूर) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. कोल्हापूर-पन्हाळा रोडवर वडणगे फाटा - चिखली फाटा दरम्यान रविवारी रात्री अपघात झाला.
उर्णव संतोष कब्बुरे (20, रा. उरुण ईश्वरपूर, ता. वाळवा) असे जखमीचे नाव आहे. अपघातात जखमी झालेल्या युवतीचे नाव रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही. अपघातामुळे कोल्हापूर-पन्हाळा मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. जखमींना तत्काळ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
करवीर पोलिस ठाण्यातून सांगण्यात आले की, उरुण ईश्वरपूर येथील दिग्विजय पाटील, उर्णव कब्बुरेसह युवती दुचाकीवरून तिब्बल सीट कोल्हापूरहून चिखली फाट्याकडे जात होते. चिखली फाट्याच्या दिशेने भरधाव जाणार्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात विशाळगडहून कोल्हापूरकडे येणार्या एसटीच्या उजव्या बाजूला जोरात धडक झाली. त्यात दिग्विजय रस्त्यावर कोसळला. रक्तस्राव होऊन त्याचा मृत्यू झाला तर उर्णव याच्यासह युवती गंभीर अवस्थेत रस्त्यावर तडफडत पडली होती.
चिखली फाट्यावरील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेऊन जखमींना शासकीय रुग्णालयाकडे हलविले. मात्र उपचारापूर्वी दिग्विजय यांचा मृत्यू झाल्याचे तर उर्णव, युवतीची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक किशोर शिंदे, सहायक निरीक्षक बाबासाहेब सरवदे, उपनिरीक्षक विनायक सपाटे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघातातील दुचाकीचा चक्काचूर झाला होता. अपघातामुळे एक तासाहून अधिक काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.