साधूंच्या केसालाही धक्का लागू देणार नाही : मुख्यमंत्री शिंदे

राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान मोठे
Chief Minister Shinde says Even the hair of sadhus will not be shocked
कोल्हापूर : कणेरी मठ येथे झालेल्या संत समावेश सोहळ्यात हिंदू धर्म रक्षणासाठी भगवा झेंडा फडकवताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. शेजारी अद़ृश्य काडसिद्धेश्वर महाराज, निरंजननाथ महाराज, रामगिरी महाराज, अक्षय महाराज भोसले, राणा महाराज वासकर, माणिक महाराज, गहिनीनाथ महाराज, देवरथ महाराज आदी. Pudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : राज्यसत्तेला सतत मार्गदर्शन करण्याची दिव्य परंपरा आपल्या भारतीय संस्कृतीत सर्व साधू-संतांनी म्हणजे धर्मसत्तेने केली आहे. राज्यसत्तेला मार्गदर्शन करण्याचे काम धर्मसत्तेने केले आहे. त्यामुळे राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान कायम मोठे आहे. महायुती सरकारच्या कालावधीत साधू-संतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.

कणेरी मठ येथे धर्म जागरणासाठी संत समावेश या दोन दिवसीय सोहळ्याच्या समारोपप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी अद़ृश्य काडसिद्धेेश्वर महाराज, रामगिरी महाराज, निरंजननाथ महाराज, गहिनीनाथ महाराज आदी प्रमुख उपस्थित होते.

हिंदू धर्माचे रक्षण करणे कर्तव्य...

आम्ही कुणाच्या धर्माच्या विरोधात नाही. कुणाच्याही धर्माचा अनादर करत नाही; पण आमच्या धर्माचे रक्षण करणे हे आमचे परमकर्तव्य आहे. हिंदू धर्मातील साधू-संतांचा आशीर्वाद घेणे, मार्गदर्शन घेणे हे धर्मपालन आहे. हिंदू धर्म आणि संस्कृतीवर सतत टीका करणार्‍या टोळ्या आहेत, त्यांचे विचारांनी निर्दालन करणे गरजेचे आहे, हे सांगणारे आमचे हिंदुत्व आहे, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. साधू-संतांनीही महायुती सरकारच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवाव्यात, त्यातून पुण्याई लाभेल. तसेच सरकारलाही सहकार्य होईल, असे आवाहनही मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

लोकांना मदत करणारा मी मुख्यमंत्री...

आपली संस्कृती, परंपरा जोपासली पाहिजे. पुढे नेली पाहिजे. ते आपले कर्तव्यच आहे, असे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, दोन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी मंदिरे, सण उत्सव बंद केले होते; पण महायुतीच्या कालावधीत मंदिरे खुली केली. सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होऊ लागले. पंढरपूरला मुख्यमंत्री शिंदे हे आठ दिवस मोटारसायकलवरून फिरल्याची टीका झाली; पण वारकर्‍यांसाठी मी फिरत होतो. मी घरात बसून आदेश देणारा मुख्यमंत्री नाही, तर लोकांच्या दारात जाऊन त्यांना मदत करणारा मुख्यमंत्री आहे, असा टोलाही त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.

त्यांचे जोतिषी फेल झाले...

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राजकीय धकाधकीत असे दुर्मीळ क्षण माझ्या वाट्याला आले हे मी माझे भाग्य समजतो. संत महात्म्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय राज्याचा गाढा हाकणे सोपे नाही; अन्यथा काही ज्योतिषी महायुतीचे सरकार महिन्याने पडणार... दोन महिन्यात पडणार, असे सांगत सुटले होते. परंतु, सरकारने कार्यकाळ पूर्ण केला. त्यांचा ज्योतिषी फेल झाला. महायुतीच्या सरकारने मजबूत काम केले. संत सज्जनांचे पोटभर आशीर्वाद मिळाले. पोटभर माया मिळाली म्हणूनच मुख्यमंत्री म्हणून मी काम करू शकलो. रोज शिव्याशाप देणे ही त्यांची शिकवण आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेला आणि पैशाच्या राशीत खेळणारा असाच त्यांच्या द़ृष्टीने मुख्यमंत्री असतो, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

जनता हेच प्रोटेक्शन अन् टॉनिक...

जनता हेच माझे प्रोटेक्शन आणि जनता हेच माझे टॉनिक आहे. आडवे आलेले स्पीड ब—ेकर बाजूला करून निर्णय घेतला. सर्वसामान्यांच्या मनातील सरकार आणले नसते, तर लाडकी बहीण योजनेसह इतर योजना आणू शकलो नसतो. गोशाळा संरक्षण केले पाहिजे. गोमातेला राज्य गोमातेचा दर्जा देऊन प्रत्येक गायीला दिवसाला चार्‍यासाठी 50 रुपये देण्याचा निर्णय घेतला. गोशाळेतील गायींसाठी हा निर्णय असला, तरी शेतकर्‍यांनाही देताना सरकार हात आखडता घेणार नाही, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

कोट्यवधी लोकांना जागृत करण्याची ताकद संतांकडे...

धर्मजागृतीसाठी अशी संमेलने होणे ही काळाची आणि समाजाची गरज आहे. कोट्यवधी लोकांना जागृत करण्याची ताकद संतांकडे आहे. त्यांना धर्माची जाणीव करून देऊ शकता. सरकार आणि सत्ता येते-जाते; पण नाव एकदा गेले की परत येत नाही. त्यामुळे स्वतःच्या स्वार्थासाठी समाजात तेढ निर्माण करण्याचे काम आमच्याकडून होणार नाही. समाजा-समाजात तेढ निर्माण होऊ नये, यासाठी संतांकडे संजीवनी आहे. त्यामुळे या संमेलनामुळे समाजात बराच फरक पडेल. हिंदू धर्म सहिष्णू आणि व्यापक आहे. द्वेष, मत्सर आपल्या धर्मात नाही. परंतु त्याचाच गैरफायदा काही लोक घेत आहेत. मंदिरात जाऊन घंटा बडवणारे आमचे हिंदुत्व आहे, असा आरोप आमच्यावर केला जातो. मात्र आमचे हिंदुत्व लोकांचे अश्रू पुसणारे, मदत करणारे आणि सर्वांना जोडणारे आमचे हिंदुत्व आहे, असा टोलाही मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना लगावला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news