जेलमध्ये जाईन; पण योजना बंद पडू देणार नाही : मुख्यमंत्री शिंदे

शिरोळ येथे राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या प्रचारार्थ लाडक्या बहिणींचा मेळावा
Maharashtra Assembly Election | Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Pudhari News Network
Published on
Updated on

जयसिंगपूर : लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे ही योजना सुपरहिट झाली. त्यामुळे विरोधकांच्या पोटात पोटशूळ उठला आहे. काही सावत्र भाऊ ही योजना बंद पडावी म्हणून कोर्टात गेले आहेत. मी जेलमध्ये जाईन; पण ही योजना कधीही बंद पडू देणार नाही. शिरोळ विधानसभेचे महायुतीचे उमेदवार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यातील 1 लाखाहून अधिक बहिणींना या योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. अशा भावाला मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

शिरोळ येथील टारे मल्टिपर्पज हॉल येथे महायुती व राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्या प्रचारार्थ लाडक्या बहिणींचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी महिलांनी शिट्टी वाजवून मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्य सरकारने महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. या योजनांना महिलांचाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, विरोधक ही योजना बंद करून सर्वांची चौकशी लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत. महायुतीचे उमेदवार राजेंद्र पाटील- यड्रावकर असा कार्यकर्ता आहे, तो कसा पण उभा राहिला तर निवडून येतो. 20 तारखेला लाडक्या बहिणींनी आपल्या भावासाठी मतदान करावे, जेणेकरून समोरच्याची डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, तर यापुढे लाडक्या बहिणींनी सरकारला या निवडणुकीत मोठी साथ दिली, तर लाडकी बहीण योजनेची रक्कम 3 हजार रुपये करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

स्वागत व प्रास्ताविक वर्षा पाटील यांनी केले. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे पराग पाटील, वतन पठाण, संकेत मगदूम यांनी आपल्या समर्थकांसह, तर छत्रपती ग्रुपचे प्रमुख प्रमोद पाटील, राजश्री कोगले, महेश कोगले यांनी आपल्या समर्थकांसह आ. राजेंद्र पाटील यांना पाठिंबा दिला. खासदार धैर्यशील माने, महायुती व राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, मयूर उद्योग समूहाचे संजय पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने, भाजपाचे नेते रामचंद्र डांगे, शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने-पाटील, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख सतीश मलमे, सत्येंद्रराजे नाईक निंबाळकर, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख माधुरी टाकारे, सुशांत पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष मुकुंद गावडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख उदय झुटाळ, बहुजन विकास आघाडीचे नेते रणजितसिंह पाटील, सुरेश शहापुरे यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि असंख्य लाडक्या बहिणी उपस्थित होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news