

कोल्हापूर : आपल्यासारख्या थोरामोठ्यांचे आशीर्वाद आहेत. त्यामुळे आजचा कार्यक्रम होत आहे, अशा शब्दांत भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सर्किट बेंचविषयी दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्यासमोर आपल्या भावना व्यक्त केल्या. डॉ. जाधव यांनी रविवारी सकाळी शासकीय विश्रामगृहावर त्यांची भेट घेतली. यावेळी गवई यांनी डॉ. जाधव यांच्याशी मनमोकळा संवाद साधत जुन्या कौटुंबिक आठवणींनाही उजाळा दिला.
कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्घाटन सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते रविवारी दुपारी झाले. तत्पूर्वी, सकाळी सरन्यायाधीश गवई यांची डॉ. जाधव यांनी भेट घेऊन सर्किट बेंच स्थापनेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल ‘पुढारी’ माध्यम समूहाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. कोल्हापुरी फेटा, शाल, श्रीफळ, करवीर निवासिनी श्री अंबाबाईची प्रतिमा, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा, डॉ. जाधव यांचे आत्मचरित्र ‘सिंहायन’च्या प्रती देऊन डॉ. जाधव यांच्या हस्ते गवई यांचा सत्कार करण्यात आला.
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे, याकरिता गेल्या 50 वर्षांपासून अखंड लढा सुरू होता. दैनिक ‘पुढारी’ने सर्वप्रथम मागणी केली आणि ती पूर्णत्वाला जाईपर्यंत त्याचा कृतिशील पाठपुरावा केल्याचे डॉ. जाधव यांनी यावेळी सांगितले. कोल्हापूरकरांच्या या लढ्याला आपण न्याय दिलात, आपल्या योगदानानेच सर्किट बेंच अस्तित्वात आल्याचे डॉ. जाधव यांनी सांगताच, सरन्यायाधीश गवई यांनी जाधवसाहेब, हे आपल्यासारख्या थोरामोठ्यांचेच आशीर्वाद आहेत. राजर्षी शाहू महाराज, करवीर निवासिनी श्री अंबाबाईची कृपा आहे, यामुळेच हा कार्यक्रम होत असल्याच्या भावना गवई यांनी व्यक्त केल्या.
डॉ. जाधव यांनी सरन्यायाधीश गवई यांना, त्यांचे वडील आणि राज्यातील ज्येष्ठ नेते दिवंगत रा. सु. गवई यांच्या कोल्हापूरसह राज्यातील सामाजिक चळवळीतील आणि राजकीय कारकिर्दीतील आठवणी सांगितल्या. विधान परिषदेचे उपसभापती असताना, तसेच त्यांच्या समवेत सीमाप्रश्नाच्या लढ्यातीलही आठवणी सांगितल्या. या सर्व आठवणी आजही स्मरणात असल्याचे सरन्यायाधीश गवई यांनी सांगितले. यावेळी डॉ. जाधव यांच्याशी त्यांनी सामाजिक विषयांवरही चर्चा केली. यावेळी डॉ. जाधव यांचे नातू ऋतुराज पाटील, अॅड. यशराज टेंबे, अॅड. शुभम वडणे उपस्थित होते. त्यांच्याशीही सरन्यायाधीश गवई यांनी वकिली क्षेत्राबाबत या तरुण वकिलांना नेमके काय वाटते, त्यांचे काम कसे सुरू आहे आदी विचारणा करत त्यांच्याशीही मनमोकळा संवाद साधला.
सरन्यायाधीश गवई यांचा सत्कार करताना डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी कोल्हापुरी फेटा सोबत आणला होता. हा फेटा बांधू का, असे डॉ. जाधव यांनी विचारताच, सरन्यायाधीश गवई म्हणाले, जाधव साहेब, आपण फेटा बांधणार आहात, मी हा कोल्हापुरी फेटा नाही कसा म्हणणार, असे सांगत डॉ. जाधव यांच्याकडून फेटा बांधून घेतला.
डॉ. जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे यासाठी सुरू असलेल्या लढ्याची माहिती दिली. त्यावर सरन्यायाधीश गवई म्हणाले, आजच्या दैनिक ‘पुढारी’मध्ये ते सर्व आले आहे. मी सकाळी दैनिक ‘पुढारी’ संपूर्ण वाचून काढला आहे, असे सांगितले.