

इचलकरंजी : शौर्य, बलिदान आणि राष्ट्रनिष्ठेेचे प्रतीक असणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा येथील शंभूतीर्थावर उभारण्यात आलेला दिमाखदार पूर्णाकृती पुतळा आणि शंभूतीर्थ या स्मारकाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि श्री शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते सोमवारी (दि. 15) होत आहे. सकाळी 9.30 वाजता हा समारंभ होणार आहे. यावेळी महापालिकेच्या विविध विकासकामांचे उद्घाटनही होणार आहे.
या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरातील कॉ. मलाबादे चौक येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा 11 फुटी पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे, तसेच श्री शंभूतीर्थ परिसर विकसित करण्यात आला आहे. यासाठी माजी आ. प्रकाश आवाडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. आ. राहुल आवाडे आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज स्मारक समिती यांच्या पुढाकाराने हे काम पूर्णत्वास गेले. श्री शंभूतीर्थाचा लोकार्पण सोहळा इचलकरंजीसह पंचक्रोशीतील सर्वांसाठी ऐतिहासिक क्षण असणार आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या विविध विकासकामांचे उद्घाटनही यावेळी होणार आहे. या लोकार्पण सोहळ्यास पालकमंत्री प्रकाश आबिटकर, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, मंत्री हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील, खा. धैर्यशील माने, खा. धनंजय महाडिक, आ. राजेश क्षीरसागर, आ. राहुल आवाडे, आयुक्त पल्लवी पाटील, माजी आ. प्रकाश आवाडे, सुरेश हाळवणकर, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दोन्ही कार्यक्रम मुख्य मार्गावर असल्याने वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
रविवारी जिल्हा पोलिसप्रमुख योगेशकुमार गुप्ता, अपर पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपअधीक्षक विक्रांत गायकवाड, प्रांताधिकारी दीपक शिंदे, आयुक्त पल्लवी पाटील, स्मारक समितीचे गजानन महाजन व पदाधिकारी आदींनी तयारीचा आढावा घेतला.