CHB Professors | ‘सीएचबी’ प्राध्यापकांना मिळणार मानधन

उच्च व तंत्रशिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचे आदेश
CHB Professors to receive remuneration
CHB Professors | ‘सीएचबी’ प्राध्यापकांना मिळणार मानधनPudhari File Photo
Published on
Updated on

प्रवीण मस्के

कोल्हापूर : तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या (सीएचबी) मान्यता व मानधन तत्काळ अदा करावे, असे आदेश उच्च व तंत्रशिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी राज्यातील सर्व विभागीय सहसंचालक आणि विद्यापीठांना शुक्रवारी दिले. यामुळे ‘सीएचबी’ प्राध्यापकांना दिलासा मिळाला असून सणसूद गोड होणार आहे. दै ‘पुढारी’च्या दि.29 ऑगस्टच्या अंकात ‘सीएचबी प्राध्यापकांना ना मान्यता ना मानधन’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. याची तत्काळ राज्याचे शिक्षण संचालक डॉ. देवळाणकर यांनी दखल घेतली आहे.

संचालकांनी राज्यातील सर्व विभागीय सहसंचालकांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सूचना केल्या. ते म्हणाले, शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दोन महिने होत आले तरी महाविद्यालय आणि विद्यापीठांनी तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या (सीएचबी) मान्यतेची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. या प्राध्यापकांचे मानधन अद्याप अदा केलेले नाही, ही बाब गंभीर आहे. शासन निर्णय 17 ऑक्टोबर 2022 नुसार निश्चित केलेल्या कार्यपद्धतीनुसार विद्यापीठाकडून 31 मेपर्यंत मान्यता प्रदान करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलसचिवांना तत्काळ ‘सीएचबी’ प्राध्यापकांच्या मान्यतेबाबत कॅम्प लावावेत. प्राचार्यांनीदेखील परिपूर्ण प्रस्ताव सहसंचालक कार्यालयाकडे जमा करावेत. ज्या महाविद्यालयांनी ‘सीएचबी’ प्राध्यापकांची बिले सादर केली आहेत, ती तत्काळ मानधन काढण्यात यावे.

ज्या महाविद्यालयांनी अद्याप बिले सादर केली नाहीत, त्यांनी तत्काळ सादर करावीत. पुढील आठवड्यापर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करावी, असे आदेश उच्च व तंत्रशिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी दिले आहेत. दरम्यान, कोल्हापूर विभागाचे उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. प्रकाश बच्छाव यांनी सर्व महाविद्यालयांना तातडीचे परिपत्रक काढले आहे. यात तासिका तत्त्वावरील नियुक्त अध्यापकांचे शैक्षणिक वर्ष 2025-26 चे जुलै व ऑगस्टचे मानधन व तासिका तत्त्वावरील अध्यापकांना मान्यता देण्याबाबतचे प्रस्ताव सादर करावेत, असे परिपत्रकात म्हटले आहे.

90 टक्के प्रस्ताव विद्यापीठ स्तरावरच प्रलंबित

उच्च व तंत्रशिक्षण संचालक डॉ. देवळाणकर यांनी राज्यातील 945 महाविद्यालयांचा आढावा घेतला असता, 90 टक्के प्रस्ताव हे विद्यापीठ स्तरावरच प्रलंबित असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.

मुंबई : 57 पैकी एकाही महाविद्यालयाचा प्रस्ताव नाही.

पुणे : 132 पैकी एकाही महाविद्यालयाने मानधन देयक सादर केलेले नाही.

नागपूर : 164 महाविद्यालयांपैकी एकाचाही प्रस्ताव आलेला नाही.

कोल्हापूर : 121 पैकी केवळ 24 महाविद्यालयांच्या मान्यता झाल्या असून, 98 बाकी आहेत.

छत्रपती संभाजीनगर : 105 पैकी केवळ 10 मानधन प्रस्ताव प्राप्त.

नांदेड : 97 पैकी 15 प्रस्ताव आले आहेत.

जळगाव : 64 पैकी 11 प्रस्ताव प्राप्त.

अमरावती : 100 पैकी फक्त 5 महाविद्यालयांच्या मान्यता झाल्या आहेत.

सोलापूर : 38 पैकी 7 महाविद्यालयांची देयके कोषागारात सादर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news