Ganesh Immersion Procession | गंगावेस ते पंचगंगा रोड विसर्जन मार्ग सुरू करा

सार्वजनिक गणेशोत्‍सव महासमितीची मागणी; महाद्वार रोडवरील गर्दीचा ताण कमी करण्यासाठी उपाय
Ganesh Immersion Procession |
Ganesh Immersion Procession | गंगावेस ते पंचगंगा रोड विसर्जन मार्ग सुरू करा File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : गंगावेस ते पंचगंगा रोड हा गणेश विसर्जन मिरवणुकीचा पारंपरिक मार्ग बंद केल्यामुळे महाद्वार रोडवर मिरवणुकीचा प्रचंड ताण येत आहे. तेथे चेंगराचेंगरी होत असते. ती टाळण्यासाठी बंद केलेला गंगावेस ते पंचगंगा रोड हा मार्ग विसर्जनासाठी पुढे सुरू करावा, अशी मागणी सार्वजनिक गणेशोत्सव महासमितीने केली आहे.

चार वर्षांपूर्वी नदीपात्रात गणेशमूर्तींचे विसर्जन न करता या सार्वजनिक मंडळांनी या गणेशमूर्ती दान केल्या होत्या. त्याचा महापालिकेने स्वीकार केला होता. जी मंडळे मूर्ती दान करतात, त्यांना या मार्गावर जाण्यास अडचण नाही. ज्या गणेशमूर्ती फायबर व शाडूच्या आहेत त्यांना अडचण नाही, अशी भूमिका महासमितीने घेतली आहे.

आताही गंगावेस ते पंचगंगा नदी हा पारंपरिक विसर्जन मार्ग पूर्ववत सुरू केल्यास महाद्वार रोडवरील गर्दीचा ताण कमी येणार आहे. गंगावेस ते पंचगंगा नदी हा मार्ग बंद केल्यामुळे मिरवणूक पाहण्यासाठी महाद्वार रोडवर प्रचंड गर्दी होते व चेंगराचेंगरी होते. कारण मिरवणूकच गंगावेस येथे संपत असते. प्रशासनाने विसर्जनाचा पारंपरिक मार्ग सुरू केल्यास गर्दीचा महाद्वार रोडवरील ताण कमी होणार असल्याचा दावा महासमितीने केला आहे.

पंचगंगा नदीजवळ पूर्वी १५ फूट उंचीच्या गणेशमूर्तीसाठी विसर्जन कुंड तयार करण्याचे ठरले होते. त्याची अंमलबजावणी करण्याची मागणीही महासमितीने केली आहे. गंगावेस येथेच मिरवणूक संपत असल्याने गंगावेस ते इराणी खण हे तीन किलोमीटरचे अंतर वाढले असून, त्यासाठी सगळ्याच मंडळांचे कार्यकर्ते व प्रशासनाचीही विशेषत: पोलिसांचीही दमछाक होते. मिरवणुकीचा मार्ग पंचगंगा नदीपर्यंत केल्यास मिरवणूक पाहण्यासाठी असलेल्या मार्गावरील गर्दी कमी होऊ शकेल. गंगावेस ते पंचगंगा नदी या मिरवणूक मार्गावर छोटे-छोटे व्यावसायिक बंधू यांच्या व्यवसायावर गंडांतर आले असून, या सर्वसामान्य कुटुंबांना आधार मिळणार आहे. तसेच हा मार्ग बंद करताना प्रशासनाने राधानगरीपासून नदीकाठावरील गावांतून नदीपात्रातच विसर्जन होते, त्याकडे लक्ष दिले पाहिजे. गंगावेस ते पंचगंगा नदी या पारंपरिक मार्गावरून जाणाऱ्या गणेशमूर्तींचे दान केले जाणार असल्याने प्रशासनाने याचा फेरविचार करण्याची मागणी महासमितीने केली आहे. (उत्तरार्ध)

पारंपरिक विसर्जन मार्गासाठी महापालिकेने ठराव करावा

कोल्हापूर महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांनी पंचगंगा नदीपर्यंत विसर्जन मिरवणुकीचा मार्ग सुरू करण्याचा व नदीघाटावर विसर्जित गणेशमूर्ती दान स्वीकारण्याचा ठराव करावा, अशी मागणी महासमितीने केली आहे.

महासमितीने सुचविलेले उपक्रम

मंडळांनी धार्मिक ऐतिहासिक देखावे करावेत

कला, क्रीडा स्पर्धा व व्याख्यानमाला घ्याव्यात

महिलांसाठी पारंपरिक स्पर्धांचे आयोजन करावे

विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करावा

सर्व उत्सव पारंपरिक पद्धतीने पार पाडावेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news