

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) प्रारूप मतदार यादीवरील सुनावणी सुरू होण्याच्या अवघ्या तासभर आधी सहायक निबंधक बदलल्याने सोमवारी दुग्ध विभागाच्या कार्यालयात मोठा गोंधळ निर्माण झाला. देविदास मिसाळ यांच्याऐवजी नारायण परझणे यांना सुनावणीसाठी पाठविण्यात आल्याचे समजताच ५० हून अधिक दूध संस्थांच्या प्रतिनिधींनी याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला. अचानक करण्यात आलेल्या या बदलामागे राजकीय दबाव असल्याचा आरोप करीत प्रतिनिधींनी संताप व्यक्त केला.
‘गोकुळ’च्या आगामी निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवरील हरकती व तक्रारींवर सोमवारी सुनावणी होणार होती. सुनावणीच्या तयारीत असतानाच सहायक निबंधक देविदास मिसाळ यांच्या जागी नारायण परझणे सुनावणीसाठी उपस्थित राहिल्याचे प्रतिनिधींच्या निदर्शनास आले. याबाबत विचारणा केली असता मिसाळ यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्या जागी परझणे यांच्याकडे तात्पुरता कार्यभार सोपविल्याचे कृष्णा ठाकरे यांनी स्पष्ट केले. मात्र, या स्पष्टीकरणाने प्रतिनिधींचे समाधान झाले नाही. ‘किमान एकदा तरी खरे बोलत जा,’ अशा शब्दांत त्यांनी ठाकरे यांना धारेवर धरले. सुनावणीच्या काही वेळ आधीच अधिकारी बदलण्याची गरज काय होती, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यावेळी सुनील पाटील, अनुप वागरे, उत्तम पाटील, विठ्ठल जाधव, अरविंद कारंडे, बंटी पाटील, विजय पाटील, अभय पाटील यांच्यासह विविध दूध संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तक्रारीच्या नियमावरूनही खडाजंगी
प्रारूप मतदार यादीतील सभासद म्हणून नोंद असलेल्या एका व्यक्तीने एकच तक्रार दाखल करावी, असा नियम दुग्ध विभागाने केल्याचे समोर आल्यानंतर प्रतिनिधींनी त्यालाही तीव्र आक्षेप घेतला. या नियमामुळे अनेक संस्थांच्या हरकतींवर मर्यादा आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला. यावरूनही अधिकारी आणि संस्था प्रतिनिधींमध्ये जोरदार खडाजंगी झाली. दुग्ध विभागाचे अधिकारी कृष्णा ठाकरे हे विरोधकांच्या वाहनातून सुनावणीला येत असल्याचा आरोपही पाटील यांनी केला. ‘ठाकरेशाही खपवून घेतली जाणार नाही,’ असा इशाराही त्यांनी दिला. अचानक अधिकारी बदल, तक्रारीबाबतचा नवा नियम आणि सुनावणीच्या प्रक्रियेवरून प्रतिनिधी आक्रमक झाल्याने काही काळ दुग्ध विभागाच्या कार्यालयातील वातावरण तणावपूर्ण बनले होते.
न्यायालयीन लढाई हरल्याने ‘अदृश्य शक्तींचा डाव’
‘ज्या अदृश्य शक्तीचा न्यायालयात पराभव झाला, त्यांनी पुन्हा काही संस्थांना जाणीवपूर्वक अडचणीत आणण्यासाठी हा डाव रचला आहे. राजकीय दबावातून अधिकारी बदलून काही संस्थांना निवडणुकीत अपात्र ठरविण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप संस्थांच्या वतीने विकास पाटील यांनी केला.
प्रारूप मतदार यादीवरील हरकतींवर ३१ ऑगस्टला निर्णय
कोल्हापूर : ‘गोकुळ’ निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवरील हरकतींच्या सुनावणीला सोमवारी सुरुवात झाली. पहिल्या दिवशी ७३ हरकतदारांपैकी ५२ जणांनी उपस्थित राहून म्हणणे सादर केले. सकाळी ११ वाजता सुरू झालेली सुनावणी सायंकाळपर्यंत सुरू होती.
सर्व हरकतींची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर ३१ ऑगस्टला त्यावर निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. प्रारूप मतदार यादीवर दाखल झालेल्या हरकतींची सुनावणी पूर्ण करण्यासाठी प्रशासनासमोर आता मर्यादित कालावधी आहे. बुधवारी आणि शुक्रवारी सुट्टी असल्याने उपलब्ध तीन दिवसांत उर्वरित हरकतदारांची सुनावणी पूर्ण करावी लागणार आहे. त्यानंतर ४ सप्टेंबरला ‘गोकुळ’ची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. ३१ ऑगस्टला होणाऱ्या निर्णयाकडे ‘गोकुळ’शी संबंधित संस्था आणि इच्छुकांचे लक्ष लागले आहे.