

कोल्हापूर : कोल्हापूर स्थानकातून जाणार्या व येणार्या महालक्ष्मी एक्स्प्रेस, महाराष्ट्र, कोयना, हरिप्रिया, कोल्हापूर-अहमदाबाद, कोल्हापूर-हजरत निझामुद्दीन व कोल्हापूर-कलबुर्गी या सात एक्स्प्रेससह चार पॅसेंजर रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. एक जानेवारीपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
सकाळी दहा वाजता कोल्हापूर स्थानकात येणारी सातारा-कोल्हापूर डेमू (पॅसेंजर) आता सकाळी साडेनऊ वाजता पोहोचणार आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. सातारा-कोल्हापूर पॅसेंजर पहाटे 5 वाजून 40 मिनिटांनी सातार्यातून सुटते. ती सकाळी दहा वाजता कोल्हापूर स्थानकात पोहोचते. या गाडीने येणार्या प्रवाशांत शासकीय कर्मचार्यांची संख्या अधिक आहे. या कर्मचार्यांना सकाळी पावणेदहा वाजेपर्यंत कार्यालयात पोहोचणे आवश्यक असल्याने ही गाडी गैरसोयीची ठरत होती. यामुळे या गाडीची वेळ बदलावी, अशी मागणी सातत्याने केली जात होती.
कोल्हापुरातून मुंबईला जाणार्या कोयना एक्स्प्रेसच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. सकाळी आठ वाजून 15 मिनिटांऐवजी ती आता सकाळी 8 वाजून 25 मिनिटांनी सुटणार आहे. कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस रात्री 8 वाजून 50 मिनिटांऐवजी 8 वाजून 55 मिनिटांनी सुटणार आहे. कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया एक्स्प्रेसही सकाळी 11 वाजून 40 मिनिटांऐवजी 11 वाजून 50 मिनिटांनी सुटेल. कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस दुपारी 2 वाजून 45 मिनिटांऐवजी 2 वाजून 50 मिनिटांनी तर कोल्हापूर-कलबुर्गी दुपारी तीन ऐवजी 3 वाजून 5 मिनिटांनी सुटणार आहे. कोल्हापूर-हजरत निझामुद्दीन एक्स्प्रेस दर मंगळवारी सकाळी 9 वाजून 10 मिनिटांऐवजी 9 वाजून 35 मिनिटांनी सुटणार आहे. कोल्हापूर-अहमदाबाद दर शनिवारी दुपारी 1 वाजून 15 मिनिटांऐवजी 1 वाजून 30 मिनिटांनी सुटणार आहे.
गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस दुपारी 12 वाजून 25 मिनिटांऐवजी कोल्हापूर स्थानकात 11 वाजून 25 मिनिटांनी येईल. तिरुपती-कोल्हापूर हरिप्रिया एक्स्प्रेस दुपारी 4 वाजून 45 मिनिटांऐवजी 4 वाजून 35 मिनिटांनी येईल. मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस रात्री 8 वाजून 15 मिनिटांऐवजी 8 वाजून 25 मिनिटांनी येणार आहे.
कोल्हापूर-पुणे डेमू सकाळी पाच ऐवजी 5 वाजून 10 मिनिटांनी सुटेल. पुण्यात दुपारी दीड ऐवजी एक वाजता पोहोचेल. कोल्हापूर-मिरज सकाळी 10.30 ऐवजी 10.25 ला सुटेल आणि मिरजेत 11.40 ऐवजी 11.35 ला पोहोचेल. कोल्हापूर-सांगली सायंकाळी 6.40 ऐवजी 6.35 ला सुटणार असून मिरजेत 8.20 ऐवजी 8.15 वाजता पोहोचणार आहे. पुणे-कोल्हापूर रात्री साडेसातऐवजी 7 वाजून 35 मिनिटांनी पोहोचणार आहे. मिरज-कोल्हापूर मिरजेतून 2.40 ऐवजी दुपारी 2.35 वाजता सुटणार असून दुपारी 3.45 ऐवजी 3.50 वाजता कोल्हापुरात पोहोचणार आहे. प्रवाशांनी बदललेल्या वेळापत्रकानुसार प्रवास करावा, असे अवाहन मध्य रेल्वे पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्य शिवनाथ बियाणी, किशोर भोरावत, गोपाल तिवारी व अॅड. विनित पाटील आदींनी केले आहे.