

कोल्हापूर : विश्वरूपी गणेशाला भाविकांकडून मनाला भावेल त्या पद्धतीने विविध रूपे दिली जातात. यामुळेच प्रतिवर्षीच्या गणेशोत्सवात मूर्तीच्या स्वरूपात काळानुरूप बदल होत आले आहेत. पूर्वीच्या पारंपरिक मूर्तींपेक्षा आताच्या मूर्तींमध्ये विविधता आणि आधुनिकता दिसून येते. ‘एआय’सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मूर्ती अधिकाधिक आकर्षक केल्या जात आहेत.
शाडू माती, प्लास्टर ऑफ पॅरिस, कागदी लगदा यासह विविध प्रकारचे दगड व धातू, मेटल, पितळ, पंचधातू आणि व्हाईट मेटलचा वापर गणेशमूर्तींच्या निर्मितीसाठी केला जात आहे. इको-फ्रेंडली किंवा कायमस्वरूपी मूर्तींचाही ट्रेंड वाढला आहे.
धार्मिक ग्रंथातील उल्लेखानुसार, दोन्ही हाताच्या मुठीत मावेल इतक्या मातीपासून घडविलेला गणोबा पुजण्याची परंपरा होती. यानंतर छोट्या रंगीत मूर्ती घडू लागल्या. सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाल्यानंतर उंच गणेशमूर्ती साकारण्यास सुरुवात झाली. तालीम संस्था-तरुण मंडळांतील स्पर्धा आणि ईर्ष्येमुळे मूर्तींची उंची 5, 11, 15, 21, 25 फूट अशी वाढतच गेली.
गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसचा वारेमाप वापर होत असला, तरी पारंपरिक मूर्तींचा बाज कायम आहे. शाडूच्या गणेशमूर्तींची परंपरा घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवात काही मंडळांनी जपली आहे. साच्याचा (पॅटर्न) वापर न करता शाडू माती, कागदी लगदा, गवताच्या पारंपरिक मूर्ती हाताने साकारण्याची कला अनेक कुंभार बांधवांनी जपली आहे.
पूर्वी गणेशमूर्ती मांडी घालून बसलेल्या दगडूशेठ रूपातील असायच्या. यानंतर सिंहासनावर बसलेल्या मूर्तींचा ट्रेंड सुरू झाला. मधल्या काळात विविध देवदेवता व साधू-संतांच्या रूपात मूर्ती घडू लागल्या. महादेव, श्रीकृष्ण, श्रीराम, हनुमान, पांडव, नृसिंह, जोतिबा-खंडोबा, विठोबा यासह नवनाथ, संत तुकाराम, बाळुमामा, साईबाबा, स्वामी समर्थ अशी विविध रूपे घडली. यानंतर ट्रेंड आला तो महापुरुषांच्या रूपातील गणेशमूर्तींचा. यात छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्यरक्षक शंभूराजे, बाजीप्रभू, शिवा काशिद अशा रूपांत गणेशमूर्ती साकारण्यात आल्या. आधुनिक काळात नवनवीन थीमवर गणेशमूर्ती साकारल्या जात आहेत. यात पुस्तके, भाजीपाला, फळे, आरोग्यवर्धक उपकरणे, विविध वस्तू, पर्यावरणपूरक गोष्टी आदींचा समावेश आहे.
गणेशोत्सवात लहान, गोंडस बालगणेशमूर्तींना सर्वाधिक जास्त मागणी आहे. वारकरी, शंकर-पार्वती, नृसिंह, मोर, गरुड यासारख्या विविध संकल्पनांवर आधारित मूर्तींची निवड बालचमूंकडून केली जाते. बाप्पाच्या साजशृंगारात विशेषतः फेटे, पगड्या, बासरी, त्रिशूल, मोरपिस व कलात्मक दागिन्यांचा वापर वाढला आहे. कोल्हापुरी, शिंदेशाही, पेशवाई, राजस्थानी फेटे, विविध रंगसंगतीत वापरून गणेशमूर्ती अधिक देखण्या बनविल्या जात आहेत.