

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, ‘गोकुळ’ निवडणुकीसाठी महायुतीचे पॅनेल निश्चित झाले आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ गुरुवारी (दि. ८) सकाळी दहा वाजता ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वरून पॅनेलची घोषणा करतील, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जागावाटपासंदर्भात महायुती नेत्यांच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या निवडणुकीवरून महायुतीत निर्माण झालेला कडवटपणा दूर झाल्याचेही ते म्हणाले.
मंत्री पाटील म्हणाले, मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निश्चित केलेल्या ‘फॉर्म्युल्या’नुसार राष्ट्रवादी ९, भाजप-शिवसेना प्रत्येकी ७ आणि जनसुराज्य शक्ती पक्षाला दोन जागा असतील. पॅनेलचे नेतृत्व मंत्री मुश्रीफ करतील. शेवट गोड झाल्याने पुढेही सर्व काही गोड होईल.
घटस्थापनेला मेळावा
‘गोकुळ’ निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ घटस्थापनेला महासैनिक दरबार हॉल येथे महायुतीच्या भव्य मेळाव्याने होईल. महायुतीचे सर्व नेते, उमेदवार करवीरनिवासिनी अंबाबाईचे सकाळी दर्शन घेऊन दहा वाजता मेळाव्याला उपस्थित राहतील, असे मंत्री पाटील म्हणाले.
आज माघारीचा अखेरचा दिवस
‘गोकुळ’साठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा गुरुवारी (दि. ८) अखेरचा दिवस आहे. बुधवारी दिवसभरात १६ तर आजअखेर ४९ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. रिंगणात अजूनही १९१ अर्ज आहेत. महायुती विरुद्ध समविचारी आघाडी अशी निवडणूक होणार असल्याने ५० उमेदवार रिंगणात राहतील. त्यामुळे अखेरच्या दिवशी माघारीसाठी झुंबड उडणार आहे. दोन्ही आघाडीचे ५० उमेदवारांचे अर्ज वगळता सुमारे १४१ उमेदवारांना अर्ज मागे घ्यावे लागतील.