

गडहिंग्लज : चंदगड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष शिवाजी पाटील यांनी 24 हजारांवर मताधिक्याने विजय संपादन केला. रविवारी त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यालय गाठून भाजपला पाठिंबा देत असल्याचे पत्र दिले. फडणवीस यांनी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
शिवाजी पाटील यांनी गेल्या पाच वर्षांपासून भाजपमधून उमेदवारी मिळेल, या अपेक्षेने तयारी केली होती; मात्र राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी झाल्याने या ठिकाणी उमेदवारीचा पेच निर्माण झाला होता. निवडणुकीची तयारी पूर्ण केल्याने कोणत्याही स्थितीत थांबायचे नाही, असेच ठरवून शिवाजी पाटील यांनी निवडणूक लढवली आणि ते यशस्वी झाले. कौल स्पष्ट होत असतानाच त्यांनी आपल्या गळ्यात भाजपचा मफलर घालूनच मतमोजणी केंद्रावर उपस्थिती लावली होती. त्यामुळे ते भाजपसोबतच जाणार यामध्ये काहीच शंका नव्हती. विजयानंतर त्यांनी मतमोजणी केंद्रावरच भाजप हा माझा श्वास आहे. त्याला सोडून मी काहीच करू शकत नाही, असे स्पष्ट केले होते. आज त्यांनी मुंबईमध्ये फडणवीस यांची भेट घेत भाजपसोबत असल्याचे पत्र देत अधिकृतरीत्या जाहीर केले.