चंदगड : रयत सेवा फाऊंडेशनकडून शालेय मुलांना छत्र्यांचे वाटप

चंदगड : रयत सेवा फाऊंडेशनकडून शालेय मुलांना छत्र्यांचे वाटप

चंदगड; पुढारी ऑनलाईन : रयत सेवा फाऊंडेशन कडून चंदगड तालुक्यातील वाड्या-वस्त्यांवरील गरजू शालेय मुलांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. दुर्गम भागातील धनगरवाडे आणि वस्त्यांवर शाळेला डोक्यावर खोळ घेऊन जाणाऱ्या मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने ही पायाभूत गरज असल्याने नागरिकांमधून यावेळी समाधान व्यक्त करण्यात येत होते.

चंदगडच्या पश्चिम भागात पावसाचे प्रमाण खूप असते. त्याचसोबत मुलांना अडीअडचणीतून पायी शाळेला जावे लागत असल्याने त्यांना छत्रीची गरज ओळखून फाऊंडेशनने यासाठी पुढाकार घेतला असून काजिर्णे, पुंन्द्रा, बुझवडे, कानूर, कळसगादे, जंगमहट्टी आदी धनगरवाड्यांवर वाटप पूर्ण झाले असून आणखी काही वाड्यांवर वाटप केले जाणार असल्याचे फाऊंडेशनचे उपाध्यक्ष प्रा. संजय साबळे यांनी सांगितले.

रयत सेवा फाऊंडेशन तर्फे दरम्यानच्या काळात याच वाड्यावस्त्यावरील मुलांना ऑनलाईन शिक्षणासाठी सहा महिन्यांचे इंटरनेट रिचार्ज करण्याचे अनोखे कामही करण्यात आले होते. चंदगड तालुक्यातील दाटे व भागातील तरुणांना एकत्र करून मंत्रालयीन अधिकारी घनःश्याम पाऊसकर यांनी काही वर्षांपूर्वी या फाऊंडेशनची सुरुवात केली. सह्याद्रीच्या या घनदाट जंगल भागात तीसहून अधिक धनगरवाडे आणि वाड्या-वस्त्या असून अनेक ठिकाणी अंगणवाड्याही नाहीत. या धर्तीवर फौंडेशनने पाऊसकर यांच्या पुढाकाराने दोन अंगणवाड्याही मंजूर करून आणल्या आहेत. या भागातील शालेय मुलांच्या संपूर्ण विकासासाठी काम करण्याचे ध्येय असून शिक्षणाबाबतीत कसलीही अडचण असल्यास फाऊंडेशनशी संपर्क करावा असे आवाहनह पाऊसकर यावेळी केले आहे.

कोरोनाकाळात आरोग्य शिबिरे, मास्क वाटप, सॅनिटायझर वाटप, शैक्षणिक वस्तूंचे वाटप आदी कामे केली असून गेल्या तीन वर्षांपासून अनेक कामे फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरु असल्याचे प्रा. साबळे यांनी यावेळी सांगितले. यावेळी ज्ञानेश्वर गावडे, मारुती किंदळकर, सरदार जाधव, मनोज खरुजकर, ऋषिकेश सातार्डेकर, आकाश गावडे यांसहित नागरिक उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news