

चंदगड ः व्यवसायवृद्धीला फायदा करून देण्यासाठी जादा परतावा देतो, असे आमिष दाखवून गडहिंग्लजमधील दोघांनी चंदगड येथील कापड व्यापाऱ्याची 21 लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी राजेंद्र शिवाजी गुंडप (रा. कडगाव रोड, गडहिंग्लज) व विनायक अशोक सांगावकर (रा. गडहिंग्लज) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबतची तक्रार व्यापारी ऋषीकेश श्रीकांत कुट्रे (28, रा. केंचेवाडी, ता. चंदगड) यांनी चंदगड पोलिसांत दिली असून, गुन्हा दाखल झाला आहे. गुंडप व सांगावकर या दोघांनी 24 महिन्यांच्या मुदतीवर गुंतवणूक करण्यास सांगून रकमेवर प्रत्येक महिन्याला पाच टक्के नफा व पहिला हप्ता 45 दिवसांनी, त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला नफा व गुंतवणूक केलेली सर्व रक्कम 24 महिन्यांनंतर परत देण्याचे आमिष दाखवले होते. ऋषीकेश यांनी 15 लाख रुपये आरटीजीएसद्वारे दिले, तर काही दिवस बँकांना सुट्टी असल्याने ऋषीकेश यांच्याकडून दहा लाख रुपयेही रोख घेतले. त्यांना गुंतवलेल्या 25 लाख रकमेपोटी केवळ चार लाख नफा दिला. उर्वरित 21 लाख रुपये व त्याचा मोबदला देण्यास टाळाटाळ केली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक व्ही. एस. कोळेकर करत आहेत.