

चंदगड : कर्नाटक विधिमंडळाच्या अधिवेशनाला बेळगाव येथील महाराष्ट्र एकीकरण समितीने प्रतिमेळावा भरवून सडेतोड उत्तर देण्याच्या घेतलेल्या भूमिकेनंतर कर्नाटक पोलिस प्रशासनाने महाराष्ट्रातून येणाऱ्या बसफेऱ्या सोमवारी (दि. 8) बंद केल्या, तर मंगळवारी (दि. 9) चंदगड तालुक्यातून बेळगावला येणाऱ्या सर्व बसेस बंद ठेवण्यात येणार आहेत. दगडफेकीसारखे प्रकार होऊन नुकसान होऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.
त्यामुळे चंदगड आगारातून विविध मार्गावरून बेळगावला जाणाऱ्या 52 बस फेऱ्या बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती चंदगड आगार प्रमुख सतीश पाटील यांनी माहिती दिली. यामुळे चंदगड आगारातून बेळगावला जाणाऱ्या बस सेवेवरही मोठा परिणाम झाला असून, चंदगड आगाराच्या दिवसभरात चंदगड ते बेळगाव या 36 फेऱ्या शिनोळी येथील राज्यहद्दीपर्यंतच सोडण्यात येत आहेत. कालकुंद्री-बेळगाव या मार्गावरील 6 बस फेऱ्या, कोवाड-बेळगाव या मार्गावरील 2 बस फेऱ्या तसेच कोदाळी ते बेळगाव या मार्गावरील 4 बस फेऱ्या, दोडामार्ग-बेळगाव या 2 बस फेऱ्या पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत.
तसेच चंदगड आगाराची बेळगाव ते पणजी या 2 बस फेऱ्या बेळगाव ऐवजी चंदगड ते पणजी या मार्गावरून सुरू करण्यात आल्या आहेत. सोमवारी (दि. 8) संपूर्ण दिवस चंदगड आगाराच्या सर्व बसेस शिनोळी येथील राज्य हद्दीजवळूनच परतून पुन्हा चंदगडला जात होत्या. त्यामुळे बेळगावला जाणारे प्रवासी, रुग्ण व व्यापाऱ्यांचे तसेच नोकरवर्गाचे मोठे हाल झाले. शिनोळी राज्य हद्दी जवळ सुरू करण्यात आलेल्या चेकपोस्ट जवळ कर्नाटक पोलिसांचा 24 तास बंदोबस्त होता.