

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदी नविद मुश्रीफ यांची निवड झाली; मात्र मुश्रीफ नेमके कोणाचे? याची चर्चा थांबायला तयार नाही. मुश्रीफ यांच्या निवडीनंतर ‘गोकुळ’मध्ये सत्तांतर घडविण्यामागील प्रमुख नेते सतेज पाटील यांनी ‘गोकुळ’चे अध्यक्ष हे राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन आघाडीचे असल्याचा दावा केला. त्यावर खा. धनंजय महाडिक यांनी, कोणी काही म्हणो, ‘गोकुळ’चा अध्यक्ष महायुतीचाच असल्याने ठामपणे म्हटले होते. हा वाद कायम असतानाच आता ‘गोकुळ’चे अध्यक्ष मुश्रीफ हे संचालक मंडळासह महायुतीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांना भेटण्यासाठी दि. 4 जून रोजी मुंबईला जात आहेत. त्यामुळे अध्यक्षपदाचा दावा आघाडीचा; भेटी मात्र महायुतीच्या नेत्यांच्या, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
जिल्ह्यातील बहुतेक सर्व सहकारी संस्थांवर राजकीय नेत्यांचे वर्चस्व असले, तरी सहकारात राजकीय पक्षांचा थेट सहभाग नव्हता, ज्याचा उल्लेख सतेज पाटील यांनी केला आहे. ‘गोकुळ’वरही आजवर राजकीय नेत्यांचे वर्चस्व राहिले आहे. त्या काळातही राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर आले होते; पण ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाची राजकीय चर्चा झाली नव्हती. अरुण डोंगळे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची वेळ आली तेव्हा, महायुतीचा अध्यक्ष होणार असेल तरच आपण राजीनामा देऊ, अशी भूमिका घेतली. नंतर लगेचच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले तरच आपण राजीनामा देऊ, असे सांगितले.
राज्यातील नेत्यांच्या हस्तक्षेपानंतर सुरुवातीला निश्चित केलेले शशिकांत पाटील-चुयेकर यांचे नाव मागे पडले व अध्यक्षपद नविद मुश्रीफ यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. अध्यक्ष निवडीचे अधिकार जिल्हा पातळीवरील नेत्यांनी गमावले व राजकीय पक्षांचा हस्तक्षेप झाला. नेत्यांनी निश्चित केलेले नाव बंद पाकिटातून काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांच्यामार्फत देण्यात आले. अध्यक्ष हा राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन आघाडीचा असल्याचा दावा करण्यात आला; तर नविद मुश्रीफ यांनी ‘हम सब एक है’ अशी बोलकी प्रतिक्रिया दिली. मात्र, खा. धनंजय महाडिक यांनी कोणी काही म्हणो, ‘गोकुळ’ अध्यक्ष महायुतीचाच असल्याचे ठणकावून सांगितले. अध्यक्षपद हे राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन आघाडीकडे असल्याचा दावा करण्यात येत असला, तरी नवे अध्यक्ष मुश्रीफ हे ‘गोकुळ’च्या संचालकांसह महायुतीच्या नेत्यांना भेटण्यासाठी मुंबईला चालले आहेत. आता ते महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही भेटणार का, हे पाहावे लागेल.