

कोल्हापूर : कोल्हापूरची हद्दवाढ होऊन लोकसंख्या वाढल्याशिवाय केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येणार नाही, असे म्हणत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी (दि. 16) पत्रकारांशी बोलताना हद्दवाढीचे संकेत दिले. परंतु संबंधित गावांचे म्हणणे ऐकून घ्यावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. महापौर रूपाराणी निकम आणि उपमहापौर अक्षय जरग यांच्या कार्यालय प्रवेशासाठी कोल्हापूर महापालिकेत आले असता मंत्री पाटील बोलत होते. याप्रसंगी आमदार विनय कोरेही उपस्थित होते.
कोल्हापुरात 40-50 वर्षांनंतर भाजपचा महापौर झाला आहे. त्यामुळे फक्त आनंद व्यक्त करण्यासाठी महापालिकेत आलो आहे. महापालिका प्रशासनात ढवळाढवळ करण्याचा कोणताही हेतू नाही. तशी आवश्यकताही नाही. परंतु विकासकामांत अडथळे निर्माण करून स्वतःचा स्वार्थ साधण्याचे काम नगरसेवकांनी करू नये. नगरसेवकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. शहरातील जयंती नाला, पंचगंगा प्रदूषण, वाहतूक कोंडीसह अनेक प्रलंबित विषयांसाठी मुख्यमंत्र्यांकडे प्लॅन आहेत. या अधिवेशनात त्यातील अनेक प्रश्न मार्गी लागतील.
कोल्हापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच व्हावा, असा आमचा आग्रह आहे. जनसुराज्य शक्ती पक्ष आणि भाजप हे दोन शरीर आणि एक आत्मा आहेत. त्यामुळे दोघांचे मिळून 18 सदस्य आमच्याकडे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या 20 आणि आमचे 18 यात जास्त फरक राहात नाही. त्यामुळे अध्यक्षपदाचा निर्णय झाल्यानंतर इतर पदांचा प्रश्न सुटेल. तसा निर्णय झाला तर महापालिकेप्रमाणे जिल्हा परिषदेतही प्रत्येकी सव्वा वर्षाचे चार अध्यक्ष होतील, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.