

गगनबावडा : गगनबावडा-वैभववाडी मार्गावर करूळ घाटात सिमेंटने भरलेला ट्रक दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात विजापूर (कर्नाटक) येथील बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी पहाटे सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास घडली.
राजू प्रेमसिंग राजपूत (वय 59) आणि राहुल राजू राजपूत (20, रा. विजापूर, कर्नाटक) अशी मृतांची नावे आहेत. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला, तरी अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. कर्नाटकातील गुलबर्गा येथून सिमेंट घेऊन ट्रक वैभववाडीकडे येत होता. चालक राजू राजपूत यांच्यासोबत त्यांचा मुलगा राहुल राजपूतही ट्रकमध्ये होता. करूळ घाटात पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ट्रक आला असता चालकाचा ताबा सुटून ट्रक घाटरस्त्यावरील क्रॅश बॅरिअर तोडत सुमारे 300 फूट खोल दरीत कोसळला. ट्रकमधील सिमेंटच्या बॅगा दरीत विखुरल्या होत्या.
या अपघाताची माहिती पाठोपाठ येणारे चालक गोपाळ राठोड यांनी 112 या आपत्कालीन क्रमांकावर दिली. त्यानंतर काही मिनिटांत वैभववाडी पोलिस ठाण्याला माहिती मिळाली. पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्यासह पोलिस पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. सह्याद्री जीवरक्षक टीमचे अध्यक्ष हेमंत पाटील व सहकारीदेखील घटनास्थळी दाखल झाले. सुमारे 300 फूट खोल दरीत उतरून मृतदेह बाहेर काढण्यासाठी टीमला मोठी कसरत करावी लागली. दोन्ही मृतदेह वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
या अपघाताची माहिती मिळताच राजपूत यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने वैभववाडीत दाखल झाले. या दुर्घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत राजू राजपूत यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि दोन मुली असा परिवार आहे. अपघाताची नोंद वैभववाडी पोलिसांत झाली असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक उल्हास जाधव करत आहेत.