

कोल्हापूर : महिलेस कार्यालयात बोलावून तिच्या नवऱ्यास ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या माजी जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवलेंसह १० जणांवर गुन्हा दाखल झाला. बुधवारी (दि. १३ मे) सायंकाळी खरी कॉर्नर परिसरात हा प्रकार घडला असून, याबाबतची फिर्याद शक्ती विक्रम भोसले (वय ३२, रा. शाहूपुरी ३ गल्ली) यांनी बुधवारी (दि. २) रात्री उशिरा जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली. यानुसार शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख रविकिरण विष्णुपंत इंगवले, शुभम सूर्यवंशी, यश जाधव, आशिष अशोक जाधव, अनोळखी महिलेसह ६ ते ७ जणांवर गुन्हा दाखल झाला.
शक्ती भोसले हे टिंबर मार्केटमधील एका डेकोस्टोनमध्ये नोकरीस आहेत. शनिवारी (दि. २ मे) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास एका महिलेने त्यांना डेकोस्टोनमधून बाहेर बोलावून घेतले. शुभम सूर्यवंशी, यश जाधव, आशिष जाधव यांच्यासह ६ ते ७ जणांनी शक्तीला शिवीगाळ करत तू रविकिरण इंगवलेंबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर दोघांनी लोखंडी रॉडने शक्तीच्या खांद्यावर, पोटावर मारहाण करुन जखमी केले.
काही दिवसांतच शक्तीला एका गुन्ह्यात राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. याचदरम्यान बुधवारी (दि. १३ मे) सायंकाळी शक्ती भोसले यांच्या पत्नीस रविकिरण इंगवले यांनी त्यांच्या खरी कॉर्नर येथील कार्यालयात बोलावून घेऊन ‘तुझ्या नवऱ्याला मारण्याठी मीच लोकांना पाठविले होते, त्यावेळी तो वाचला. आता जेलमधून जामिनावर बाहेर आल्यानंतर जिवंत ठेवत नाही, बऱ्याच लोकांना वर पाठवलेले आहे, तुझ्या नवऱ्याला पण पाठवतो,’ अशी धमकी दिली. या प्रकरणी बुधवारी (दि. २) रात्री उशिरा हा गुन्हा दाखल झाला.