

कोल्हापूर : सिद्धार्थनगर - राजेबागस्वार परिसरात शुक्रवारी रात्री उसळलेल्या दंगलप्रकरणी दोन्ही गटांतील प्रमुखांसह 400 जणांवर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हे दाखल झाले. दहशतीच्या बळावर कायदा हातात घेणार्यांवर कठोर कारवाईचे निर्देश पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी दिले आहेत. दरम्यान, शनिवारी दुसर्या दिवशी परिस्थिती नियंत्रणात असली तरी परिसरात तणावपूर्ण शांतता होती. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांचा कडक पहारा ठेवण्यात आला आहे.
गुन्हे दाखल झालेल्यांत राजेबागस्वार येथील असिफ शेख, शहारुख शेख, कौशिक राजू पटवेगार, सोहेल पटवेगार, तनवीर मुजावर, नौशाद मुजावर, शाहरुख रिक्षावाला, तौसिफ शेख, अब्दुल रौफ सिद्धीकी, अश्पाक गॅसवाला, जरिब इनामदार रिक्षावाला, सोहेल शेख, समीर मेस्त्री गॅरेजवाला, परवीन बशीर शेख, आश्रफ सिद्धीकी, इजाज शेख, साहिल हाकीम, परहाज नायकवडी, निहाल शेख, सद्दाम महात, अश्पाक नायकवडी, इकबाल सरकवास, बिलाल शेख, मुन्ना सिद्धीकीसह 150 ते 200 अनोळखी तसेच सिद्धार्थनगर परिसरातील सुरज कांबळे, अभिजित कांबळे, शुभम कांबळे, विजय पटकारे, महेश कांबळे, लखन कांबळे, गणेश कांबळेसह अनोळखी 150 ते 200 संशयितांचा समावेश असल्याचे पोलिस निरीक्षक श्रीराम कण्हेरकर यांनी सांगितले.
सिद्धार्थनगर-राजेबागस्वार परिसरात शुक्रवारी रात्री झालेल्या दंगलीवेळी दगडफेकीत अधिकार्यांसह कॉन्स्टेबलही जखमी झाले आहेत. शिवाय वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करून एक लाखाचे नुकसान झाले आहे. गुन्हे दाखल झालेल्या संशयितांना तत्काळ अटक करण्याचे निर्देश पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी दिले आहेत.
दोन्ही गटांकडून झालेल्या दगडफेकीत स्थानिक गुन्हे अन्वेषणचे उपनिरीक्षक शेष मोरे, कॉन्स्टेबल आबीद खुदबुद्दीन मुल्ला यांच्यासह परहाज बशीर नायकवडी, निहाल रहिमतुल्ला शेख, सद्दाम यार्जुन महात, अश्पाक शब्बीर नायकवडी, इकबाल दौड, चरकवास (सर्व, रा. राजेबागस्वार, जुना बुधवार पेठ) हे जखमी झाले. तीन वाहनांचे एक लाखाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, या घटनेनंतर शनिवारी सिद्धार्थनगर परिसरात तणावपूर्ण शांतता होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस अधिकारी बारकाईने लक्ष ठेवून आहेत. अद्यापही या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.
पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अपर अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू, अण्णासाहेब जाधव, शहर उपअधीक्षक प्रिया पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सकाळी परिसराची पाहणी करून नागरिकांना शांततेचे आवाहन केले. सरकारच्या वतीने कॉन्स्टेबल एकनाथ कळंत्रे यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.