कोल्हापूर : हिंदू धर्मीयांच्या भावना दुखाविणारे वक्तव्य केल्याप्रकरणी ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांच्याविरुध्द लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला. अखिल भारत हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष संदीप ससाणे (रा. शिवाजीपेठ, कोल्हापूर) यांनी फिर्याद दाखल केली. महेश यादव, राजाराम परीट यांनीही महाराव यांच्याविरुध्द तक्रार अर्ज दिला आहे.
नवी मुंबई (वाशी) येथे विष्णुदास भावे नाट्यगृहात 22 ऑगस्टला झालेल्या संभाजी बि—गेडच्या राज्यस्तरीय अधिवेशनात ज्ञानेश महाराव यांनी समस्त हिंदू धर्मीयांचे आराध्य दैवत प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, सीता, उर्मिलामाता तसेच स्वामी समर्थ यांच्याविषयी अवमानकारक, आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यामुळे हिंदू धर्मीयांच्या भावना दुखाविण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न झाला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
महाराव यांच्याविरुध्द फिर्याद दाखल करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकार्यांनी सकाळपासून लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या आवारात गर्दी केली होती. यावेळी आनंदराव पवळ, दीपक देसाई, अभिजित पाटील, आशिष लोखंडे, अनिरुध्द कोल्हापुरे, निरंजन शिंदे, केदार मुनीश्वर, शिवानंद स्वामी आदी उपस्थित होते.