

कोल्हापूर : महापालिका निवडणूक वादातून शिवाजी पेठ येथील विजयी उमेदवार इंद्रजित बोंद्रे आणि पराभूत उमेदवार शिवतेज खराडे यांच्या समर्थकांत झालेल्या धुमश्चक्रीप्रकरणी बोंद्रे गटाच्या 50 समर्थकांवर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संशयितांनी बेकायदा जमाव करून माजी महापौर सई अजित खराडे यांच्यासह चौघांना मारहाण, दगडफेक करून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांत अजित दळवी, उत्तम तिबिले, पृथ्वीराज सरनाईक, सत्यजित दळवी, आदित्य दळवी, नीलेश तिबिले, दिगंबर तिबिले (रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) यांच्यासह 40 ते 50 जणांचा समावेश आहे. बोंद्रे गटाच्या समर्थकांनी केलेली दगडफेक, मारहाणीत स्वत: फिर्यादी रोहित महादेवराव खराडे (वय 48), सई अजित खराडे, केतन किरण जाधव, अभिमन्यू सर्जेराव पाटील (रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) जखमी झाले आहेत.
कोल्हापूर महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवार इंद्रजित बोंद्रे आणि पराभूत उमेदवार शिवतेज खराडे यांच्या समर्थकांत शिवाजी पेठ येथील मर्दानी खेळाचा आखाडा परिसरात जोरदार राडा झाला होता. दोन्हीही गटांच्या समर्थकांनी एकमेकांच्या घरांवर तुफान दगडफेक केल्याने शिवाजी पेठेसह परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. दोन गटांतील संघर्षानंतर पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाल्यानंतर दोन्ही बाजूंकडील जमाव पांगला.
दोन्हीही बाजूंकडून झालेल्या दगडफेकीत बोंद्रे गल्ली, मर्दानी खेळाचा आखाडा परिसर आणि खराडे यांच्यासह परिसरातील बंगल्यांचे नुकसान झाले होते. दोन मोटारींसह दोन दुचाकींचेही नुकसान झाले होते. परिसरातील रस्त्यावर, चौकात दगड- विटांचा खच पडला होता. शनिवारी दुसर्या दिवशीही परिसरात तणावपूर्ण शांतता होती. खबरदारीचा उपाय म्हणून बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे. शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील, पोलिस निरीक्षक किरण लोंढे यांनी सकाळी शिवाजी पेठेसह परिसराची पाहणी केली.
खराडे गटाच्या वतीने रोहित खराडे यांनी शुक्रवारी रात्री उशिरा जुना राजवाडा पोलिस ठाण्यात बोंद्रे गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांसह 40 ते 50 समर्थकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. निवडणूक निकालानंतर संशयितांनी बेकायदा जमाव करून खराडे समर्थकांवर दगडफेक करून, लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
गोळीबाराची केवळ अफवा : पोलिस निरीक्षक किरण लोंढे
शिवाजी पेठ येथील दोन गटांतील धुमश्चक्रीत गोळीबार करण्यात आल्याची अफवा पसरविण्यात आली आहे. त्यामध्ये कोणतेही तथ्थ नसल्याचे जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण लोंढे यांनी सांगितले. शुक्रवारी रात्री उशिरा खराडे यांच्या बंगल्यावर दगडफेक झाल्याचीही अफवा पसरविण्यात आल्याचे ते म्हणाले.