

कोल्हापूर : भारतीय वायुसेनेच्या इतिहासात जी काही तेजस्वी, अजरामर पानं लिहिली गेली, त्यामध्ये ग्रुप कॅप्टन दिलीप पारूळकर यांचे नाव सदैव सुवर्णाक्षरांनी कोरले जाईल. वयाच्या 82 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं आणि राष्ट्राने एका दुर्मीळ योद्ध्याला गमावलं.
पारूळकर हे स्वर्गीय मेजर आनंदराव घाटगे यांचे भाचे होते. शुक्रवार, दि.22 रोजी त्यांचे उत्तरकार्य पुणे येथील निवास्थानी असल्याचे स्पष्ट करून घाटगे म्हणाले, पारूळकर आमच्या परिवाराचे अभिमानस्थान होते. त्यांचे संपूर्ण आयुष्य राष्ट्रनिष्ठा आणि शौर्याचे प्रतीक आहे. त्यांच्या निधनाने आम्ही एक थोर मार्गदर्शक गमावला.
1965 च्या भारत-पाक युद्धाने भारतीय लष्कर आणि वायुसेनेला अनेक नायक दिले. त्यामध्ये पारूळकर अग्रस्थानी होते. शत्रूच्या गोळीबारात त्यांचं विमान भेदलं गेलं. गोळी त्यांच्या खांद्याला लागली; पण त्यांनी हार मानली नाही. विमान सुरक्षित तळावर उतरवून त्यांनी दाखवले की, खरी शौर्यगाथा म्हणजे वेदनेवर मात करूनही राष्ट्रहिताला प्राधान्य देणे. या अद्वितीय पराक्रमासाठी त्यांना वायुसेना पदक देण्यात आले. 1971 च्या युद्धादरम्यान त्यांच्यावर कठीण प्रसंग ओढवला. शत्रूने त्यांना पकडलं आणि रावळपिंडीच्या युद्धकैदी छावणीत टाकलं. साधारण एक वर्ष त्यांनी तिथं खडतर परिस्थिती सहन केली; पण कैदेत असतानाही त्यांचा आत्मविश्वास डगमगला नाही. त्यांनी सहकार्यांसोबत बोगदा खोदून पळून जाण्याचा प्रयत्न केला. ते पकडले गेले, तरी या धाडसी कृतीने त्यांनी शत्रूच्या मनातसुद्धा आदर निर्माण केला.
मार्च 1963 मध्ये आयएएफमध्ये कमिशन मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या कार्यतत्परतेने सर्व वरिष्ठांचे लक्ष वेधून घेतले. विविध पदांवर काम करताना त्यांनी केवळ वैमानिक म्हणूनच नव्हे, तर एक उत्तम प्रशिक्षक म्हणूनही ख्याती मिळवली. एअर फोर्स अकादमीमध्ये फ्लाईंग इन्स्ट्रक्टर म्हणून त्यांनी शेकडो तरुण वैमानिकांना घडवले. 1979 ते 1981 या काळात सिंगापूरमध्ये ते प्रतिनियुक्तीवर गेले. भारतीय हवाई दलाच्या कौशल्याचे दर्शन त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर घडवले. त्यांच्या अखंड समर्पणासाठी त्यांना विशिष्ट सेवा पदकाने (व्हीएसएम) गौरवण्यात आले. कैदेतल्या आठवणी व प्रेरणा याबद्दल त्यांचे सहकारी एअर मार्शल सुभाष भोजवानी आणि एअर मार्शल भूषण गोखले यांनी सांगितले होते की, पारुळकर हे केवळ धैर्यवान सैनिक नव्हते, तर एक जीवलग मित्र, मार्गदर्शक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होते.
पाकिस्तानातल्या तुरुंगात एका पाकिस्तानी अधिकार्याच्या पत्नीने कैद्यांना विचारलं, तुम्हाला सर्वांत जास्त कोणत्या गोष्टीची आठवण येते? तेव्हा पारूळकर म्हणाले, चायनीज जेवणाची. दुसर्या दिवशी रात्री त्यांना जेवणात चायनीज पदार्थ मिळाले. युद्ध कैद्यांनाही माणूस म्हणून पाहण्याचा तो एक क्षण होता. अशा असंख्य आठवणींनी ते नेहमीच आपल्या सहकार्यांना भारावून टाकायचे.
रविवारी सकाळी त्यांनी नाश्ता केला आणि हृदयविकाराचा झटका आला. त्यांचे पुत्र आदित्य यांनी सांगितलं की, काही क्षणांतच सर्व काही संपलं. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी वायुसेनेच्या अधिकार्यांनी पुष्पहार अर्पण करून अखेरचा निरोप दिला. त्यांच्या पश्चात पत्नी राजलक्ष्मी आणि दोन मुलं सचिन व आदित्य असा परिवार आहे.
पारूळकर यांचे स्मरण म्हणजे आमच्या डोळ्यांत पाणी आणि हृदयात अभिमान जागवणारा क्षण आहे. ते आमचे घराणे व समाजाचे प्रेरणास्थान होते. त्यांच्या तेजस्वी स्मृती आम्हाला सतत राष्ट्रनिष्ठेची जाणीव करून देतील. आम्हा परिवाराच्या वतीने त्यांना अखंड नमन करतो. पारूळकर हे केवळ योद्धे नव्हते, तर ‘भारत माता की जय’ या घोषणेचं जिवंत मूर्त रूप होते. त्यांचा वारसा हा आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.
कॅप्टन पारूळकर यांना माजी आमदार संजय घाटगे कुटुंबीय व नातेवाईकांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!
पारूळकर हे खेळप्रेमी होते. टेनिस हा त्यांचा आवडता खेळ. तासन् तास कोर्टवर राहून ते खेळायचे. विम्बल्डन आणि ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांना ते नियमित जात असत. हा त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा द़ृष्टिकोन दाखवतो की, कठोर शिस्तीतून गेलेलं आयुष्य जगतानादेखील आनंद आणि आवडींना कधीही विसरू नये.
ग्रुप कॅप्टन दिलीप पारूळकर यांचं आयुष्य हे धैर्य, चिकाटी आणि राष्ट्रनिष्ठेचं प्रतीक आहे. युद्धभूमीवर असो, कैदेत असो किंवा प्रशिक्षण क्षेत्रात, त्यांनी प्रत्येक ठिकाणी भारतीय वायुसेनेचा झेंडा उंचावला. त्यांचं मनमोकळं हसू, त्यांचा जोश आणि त्यांचा आत्मविश्वास हे सर्व भावी पिढ्यांसाठी प्रेरणेचं झर्यासारखं आहे.