

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
फुलांनी सजविलेल्या वाहनात उमेदवार, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, आप, आरपीआय यासह विविध मित्रपक्षांचे पदाधिकारी, तिरंगी, भगवे, निळे-पिवळे ध्वज, उमेदवारांची छायाचित्रे व पक्ष चिन्हे असणार्या टोप्या, स्कार्फ, फलक घेऊन भरउन्हात आबालवृद्ध कार्यकर्त्यांचा उत्साही सहभाग अशा वातावरणात विधानसभा निवडणुकीसाठीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयाच्या घोषणा देत निवडणुकीचे अर्ज दाखल करताना जोरदार शक्तिप्रदर्शन केले. महाविकास आघाडी व मित्रपक्षांतील कोल्हापूर उत्तरच्या उमेदवार मधुरिमाराजे, कोल्हापूर दक्षिणचे उमेदवार ऋतुराज पाटील आणि करवीरचे उमेदवार राहुल पाटील यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंगळवारी भव्य रॅली काढण्यात आली. दसरा चौक, व्हीनस कॉर्नर चौक, स्टेशन रोड, असेंब्ली रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावरून रॅली काढण्यात आली. कोल्हापूर उत्तर व दक्षिणचे उमेदवार मधुरिमाराजे व ऋतुराज पाटील यांचे अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात, तर करवीर मतदारसंघाचे उमेदवार राहुल पाटील यांचा अर्ज महावीर कॉलेज, रमणमळा चौकमार्गे शासकीय गोदाम येथील कार्यालयात दाखल करण्यात आला.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादनाने रॅलीस सुरुवात झाली. खासदार शाहू महाराज, आमदार सतेज पाटील व माजी आ. मालोजीराजे यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यानंतर उमेदवार सौ. मधुरिमाराजे, ऋतुराज पाटील व राहुल पाटील यांनी पुतळ्यास अभिवादन केले. फुलांच्या माळांनी सजविलेल्या वाहनावर तिघा उमेदवारांसह सर्वपक्षीय नेतेमंडळी उभे राहून रॅलीत सहभागी झाले. रॅलीचे एक टोक दसरा चौकात, तर दुसरे टोक व्हीनस कॉर्नर चौक असे लांबपर्यंत होते. सुमारे दीड ते दोन तासांनंतर रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचली.
रॅलीत आमदार जयंत आसगावकर, डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, यशराजराजे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजय पवार व सुनील मोदी, काँग्रेसचे सचिन चव्हाण, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आर. के. पोवार, शेतकरी कामगार पक्षाचे बाबासोा देवकर, आम आदमी पक्षाचे संदीप देसाई, मल्हार सेनेचे बबन रानगे, जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील, गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके, चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने, विश्वविजय खानविलकर, बाजार समितीचे संचालक भरत पाटील, सौ. पूजा ऋतुराज पाटील, देवश्री सतेज पाटील, पृथ्वीराज संजय पाटील, तेजस सतेज पाटील, कॉम—ेड दिलीप पोवार व अतुल दिघे, मावळा संघटनेचे प्रमुख उमेश पोवार, माजी नगरसेवक रविकिरण इंगवले, भूपाल शेटे, जितेंद्र सलगर, डी. जी. भास्कर, जि. प. माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील, प्रकाश पाटील, बाबूराव कदम, क्रांतिसिंह पवार-पाटील, कॉ. रघुनाथ कांबळे, जयकुमार शिंदे, लालासो गायकवाड, चंद्रकांत चिले, दीपा पाटील, सरला पाटील, सुलोचना नाईकवडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
2004 च्या विधानसभा निवडणुकीत सतेज पाटील यांनी करवीर विधानसभा मतदारसंघातून दिग्विजय खानविलकर यांचा पराभव केला होता. वीस वर्षांनंतर 2024 साली दिग्विजय खानविलकर यांच्या कन्या व खासदार शाहू महाराज यांच्या सून मधुरिमाराजे यांच्या प्रचाराची धुरा सतेज पाटील सांभाळत आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी काढण्यात आलेल्या रॅलीत कोल्हापूर उत्तरच्या काँग्रेसच्या आमदार जयश्री जाधव अनुपस्थित होत्या.