kolhapur | कनिष्ठ महाविद्यालयांची नवीन संचमान्यता रद्द करा; अन्यथा कार्यालयाला कुलूप लावू

कौस्तुभ गावडे यांचा इशारा; शिक्षण उपसंचालकांना निवेदन
कोल्हापूर : शिक्षण उपसंचालक कार्यालयावर काढलेल्या मोर्चात सहभागी शिक्षक संघटनांचे पदाधिकारी.
कोल्हापूर : शिक्षण उपसंचालक कार्यालयावर काढलेल्या मोर्चात सहभागी शिक्षक संघटनांचे पदाधिकारी. (छाया : मिलन मकानदार)
Published on
Updated on

कोल्हापूर : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांच्या संचमान्यतेसंदर्भात शिक्षण संचालनालयाने शासनाकडे सादर केलेला प्रस्तावित मसुदा अन्यायकारक असून तो तातडीने रद्द करावा. यामुळे ८ ते १० हजार शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता असून याचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे. जुन्या पद्धतीने संचमान्यता न झाल्यास शिक्षण उपसंचालक कार्यालयाला कुलूप लावण्याचा इशारा श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी दिला. यासंदर्भातील निवेदन शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांना देण्यात आले.

प्रस्तावित नवीन संचमान्यतेच्या पार्श्वभूमीवर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर टाळे ठोक आंदोलन केले. याप्रसंगी शिक्षक आमदारांसह शासनाचा निषेध करण्यात आला. वरिष्ठ महाविद्यालयांशी संलग्न कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ४५ मिनिटांची तासिका ४० मिनिटांची करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच, विज्ञान शाखेतील २० विद्यार्थ्यांची बॅच वाढवून ३० विद्यार्थ्यांची करण्याचे प्रस्तावित आहे. या बदलांमुळे विज्ञान शाखेतील मोठ्या संख्येने शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता आहे. कला व वाणिज्य शाखांसाठी विद्यार्थी संख्या १२० करण्याच्या प्रस्तावामुळे अनेक तुकड्या अनुदानासाठी अपात्र ठरण्याची भीती व्यक्त केली.

ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमुळे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहतात. परिणामी, कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थी संख्या घटून शिक्षक अतिरिक्त होण्याची परिस्थिती आहे. नवीन निकष लागू झाल्यास कनिष्ठ महाविद्यालये बंद पडण्याचा धोका आहे. प्रस्तावित मसुद्याऐवजी प्रचलित निकषांनुसार शिक्षण उपसंचालक स्तरावर ऑनलाईन संचमान्यता प्रक्रिया राबवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनात दिलीप शितोळे, अण्णासाहेब बागडी, गोविंद वाघ, सुनील शिंदे, अभिजित दुर्गी, सुरेश भिसे, प्रा. अशोक पाटील यांच्यासह पाच जिल्ह्यांतील शिक्षक सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news