Gokul Milk Controversy | गोकुळ दूध खरेदी बंद करण्याचे फोन, अधिकाऱ्यांना शिविगाळ

Gokul Milk Controversy | गोकुळ दूध खरेदी बंद करण्याचे फोन, अधिकाऱ्यांना शिविगाळ
Published on
Updated on

कोल्हापूर : गोकुळमध्ये शुक्रवारी (दि. 29) दिवसभर गोकुळचे दूध खरेदी बंद करण्याचे फोन येत होते. पुणे, मुंबई येथे गोकुळचे मार्केट मोठे आहे. येथूनही दूध खरेदी बंद करत असल्याचे फोन संघात आले. काहींनी तर हलाल प्रमाणपत्रावरून अधिकारी, कर्मचारी यांना शिवीगाळही केली. हलाल प्रमाणपत्रावरून सुरू असलेल्या राजकारणाचा ब्रँडवर परिणाम होत आहे. तसेच अधिकारी, कर्मचारी यांनाही मनस्ताप होत असल्याने या प्रकारावरून कर्मचार्‍यांनी संताप व्यक्त केला. प्रशासक संजयकुमार सुद्रीक यांची भेट घेऊन गोकुळची बदनामी सुरू असताना तुम्ही गप्प का, असा जाब विचारला. तसेच अफवा पसरविणारे, शिवीगाळ करणार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

गोकुळच्या सुमारे 250 कर्मचार्‍यांनी शुक्रवारी (दि.29) प्रशासकांची भेट घेऊन हलाल प्रमाणपत्रावरून गोकुळची सुरू असलेल्या बदनामीबाबत जाब विचारला. यावेळी प्रशासक सुद्रीक यांनी प्रकरणाची माहिती घेऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याबाबत योग्य कारवाई करू, असे आश्वासन दिले. कारवाई न केल्यास शेतकरी, कर्मचारी हल्लाबोल आंदोलन करतील, असा इशारा कर्मचार्‍यांनी दिला. गोकुळ हा ब्रँड सातशे लिटर दूध संकलनापासून आज 17 लाख लिटर संकलनापर्यंत पोहोचला आहे. महानंदासारखा शासनाचा दूध संघही टिकविणे कठीण गेले, मात्र गोकुळ स्वतःच्या भांडवलावर सक्षमपणे कार्यरत आहे. त्यामुळे गोकुळची बदनामी होऊन ब्रँडवर परिणाम झाला तर लाखो दूध उत्पादक व कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ येईल, अशी भावना कर्मचार्‍यांनी प्रशासकांसमोर व्यक्त केली. यावेळी संघटनेचे जनरल सेक्रेटरी सदाशिव निकम, संदेश पाटील, योगेश चव्हाण, प्रकाश आडनाईक, प्रदीप पाटील, रमेश पाटील, शिवानंद शिरहट्टी, प्रवीण करडे यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पांढर्‍या दुधाला धार्मिक रंग नको

गोकुळचे दूध हे स्वच्छ आणि पांढरे दूध आहे. त्याला धार्मिक किंवा राजकीय रंग देऊ नये, राजकीय वर्चस्वातून जिल्ह्यात अनेक दूध संघ स्थापन झाले, मात्र मार्केटिंगअभावी ते टिकू शकले नाहीत. त्यामुळे गोकुळच्या मार्केटिंगवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे कर्मचार्‍यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news