

कोल्हापूर : इमारतीच्या टेरेसवर सोलर पाईप घेऊन जात असताना उच्च प्रवाहित विद्युततारांचा स्पर्श होऊन झालेल्या दुर्घटनेत शिवाजी पेठ येथील रवींद्र रंगराव जाधव (वय 52, आयरेकर गल्ली, कोल्हापूर) यांचा मृत्यू झाला, तर सौरभ संजय साळुंखे (24, रा. ताराबाई रोड, शिवाजी पेठ) हा जखमी झाला. मंगळवारी दुपारी ही घटना घडली.
विजेचा धक्का लागून प्रकृती अत्यवस्थ बनलेल्या रवींद्र जाधव, सौरभ साळुंखे यांना तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वी जाधव यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. साळुंखे याच्यावर उपचार सुरू आहेत.
जुना राजवाडा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. पोलिसांनी सांगितले की, बिसलरी विक्री व्यावसायिक रवींद्र जाधव हे दुपारी 3.30 वाजता इमारतीच्या टेरेसवर सोलरच्या पाईप घेऊन जात होते. उच्च प्रवाहित विद्युततारांना पाईपचा स्पर्श होऊन जाधव यांना धक्का बसला. जाधव यांच्यासह साळुंखे जखमी झाला. बेशुद्धावस्थेत जाधव यांना शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शिवाजी पेठेसह परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. राजवाडा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.