Rajendranagar Theft Case | कुटुंब भाजी आणायला गेले, १४ तोळे दागिने गायब झाले

राजेंद्रनगर येथील घटना; दीड तासात दागिन्यांवर डल्ला
Rajendranagar Theft Case |
Rajendranagar Theft Case | कुटुंब भाजी आणायला गेले, १४ तोळे दागिने गायब झालेFile Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : राजेंद्रनगर येथील बंद घराचा कडीकोयंडा उचकटून चोरट्यांनी १४ तोळे दागिन्यांसह रोख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. बुधवारी (दि. २४) सायंकाळी ६.३० ते ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबतची फिर्याद श्वेता वैभव देवकर (वय ३५, रा. साक्षी रेसिडेन्सी, राजेंद्रनगर) यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात दिली.

वैभव देवकर हे सांगली येथील एका बँकेत नोकरीस असून, ते आई, पत्नी, मुलग्यासोबत राजेंद्रनगर येथील साक्षी रेसिडेन्सीमध्ये तिसऱ्या मजल्यावर राहतात. बुधवारी सायंकाळी त्यांची आई दुसऱ्या मजल्यावर असलेल्या नातेवाईकांकडे गेली होती. तर वैभव पत्नी, मुलासोबत भाजी खरेदी करण्यासाठी गेले होते. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ते घरी परतले असता, त्यांना घराचा कडीकोयंडा उचकटल्याचे दिसून आले. त्यांनी बेडरूममध्ये जाऊन पाहिले असता, कपाटातील १४ तोळे दागिने आणि रोख १८ हजार रुपये लंपास झाल्याचे दिसून आले. त्यांनी याबाबतची माहिती राजारामपुरी पोलिसांना दिली. शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील, पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. घटनास्थळी ठसेतज्ज्ञ व श्वानपथकास पाचारण करण्यात आले होते.

संशयित अलिशान मोटारीतून आला

राजारामपुरी पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास एक संशयित अलिशान मोटारीतून आल्याचे तपासात समोर आले. फ्लॅटमध्ये अन्य कोठेही साहित्य विस्कटण्यात आले नव्हते. संशयिताने थेट बेडरूममध्ये जाऊन कपाटातील दागिने आणि रोकड लंपास केली. यामुळे संशयित माहितगार असल्याचा प्राथमिक अंदाज राजारामपुरी पोलिसांनी व्यक्त केला.

१४ तोळे सोने, रोख १८ हजार

पाच तोळ्याचे मंगळसूत्र, चार तोळ्याचा बकुळी हार, अडीच तोळ्याची धनेमाळ, दीड तोळ्याचे ४ झुमके, एक तोळ्याची एक अंगठी, तीन ग्रॅमची सोन्याची चेन, एक ग्रॅमची बाली, रोख १८ हजार रुपये असा सुमारे २० लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news