kolhapur | बिल्डरचे अपहरण; कोटीची खंडणी मागणाऱ्या कुख्यात गुंड अजित तिवडेसह चौघे गजाआड

कुटुंबाला धमकी देऊन काम पाडले बंद
kolhapur |
kolhapur | बिल्डरचे अपहरण; कोटीची खंडणी मागणाऱ्या कुख्यात गुंड अजित तिवडेसह चौघे गजाआड
Published on
Updated on

कोल्हापूर : बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण करून त्याला एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी डांबून ठेवल्याप्रकरणी एटी गँगचा म्होरक्या अजित तिवडेसह चौघांना जुना राजवाडा पोलिसांनी बुधवारी अटक केली. याबाबतची फिर्याद नीलेश सुरेश जाधव (वय ३२, रा. अवधूत रेसिडेन्सी, कळंबा) यांनी दिली. २९ एप्रिल ते ८ जूनदरम्यान ही घटना घडली.

अजित भगवान तिवडे (४१, रुईकर कॉलनी), फैयाज इसाक नगराजी (४२, रा. चव्हाण कॉलनी, साळोखेनगर), श्रीधर ऊर्फ लखन बाळासाहेब माने (३७, रा. उचगाव), संजय महावीर किरणगे ऊर्फ मायाभाई (४४, रा. मणेरमाळ, उचगाव) यांना अटक केली असून चालक लालाशेटसह अन्य संशयितांचा शोध सुरू आहे. चौघांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. नीलेश जाधव यांचे कळंबा येथील मोरे-मानेनगर येथे सोनी हाईटस्‌ नावाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. दि. २९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता फैयाज, संजय, लखन, लालाशेट हे जाधव यांच्या साईटवर आले. त्यांनी नीलेश यांच्या मोटारीतूनच त्यांचे अपहरण करून रुईकर कॉलनी येथील तिवडेच्या अजित ट्रेडर्स नावाच्या दुकानात नेले.

एक कोटी रुपयांची खंडणी दिल्याशिवाय सोडणार नाही, अशी धमकी देऊन एका खोलीत दिवसभर डांबून ठेवले आणि नंतर धमकी देत सोडून दिले. यामुळे घाबरलेले नीलेश जाधव हे कोल्हापूर सोडून पुण्याला गेले. ६ जून रोजी सकाळी फैयाज साथीदारांसह नीलेश यांच्या कार्यालयात येऊन जाधव यांचे भाऊ प्रताप यांना दमदाटी करत अजितदादांनी सांगितल्याप्रमाणे पैसे दिल्याशिवाय काम सुरू करायचे नाही, अशी धमकी दिली. दि. ८ जून रोजी नीलेश जाधव पत्नीसोबत जात असताना फैयाज व संजय यांनी पाठलाग करून गाठले. आमचा विषय मिटवल्याशिवाय काम सुरू करायचे नाही, अशी धमकी दिली. यानंतर जाधव यांनी मंगळवारी (दि. ३०) रात्री उशिरा याबाबतची तक्रार जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली. अधिक तपास पोलिस निरीक्षक किरण लोंढे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news