

शिरोळ : जुन्या भांडणाचा राग मनात धरून सातजणांच्या टोळक्याने दगड व कोयत्याने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दीपक दशरथ मगदूम (वय 20, रा. शिवाजीनगर, शिरोळ) या तरुणाचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. रविवारी रात्री ही घटना घडली. शिरोळ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परवेज सरदार शेख (वय 20), रोहन जगणू कांबळे (22), प्रज्योत अनिल साळोखे (23), शुभम संतोष पाटील (18), प्रतीक गजानन सावंत (22), विनायक किशोर साळुंखे (23, सर्व रा. शिरोळ) व ऋषिकेश राजू कांबळे, (21, मूळ रा. सदर बाजार, कोल्हापूर, सध्या दत्त कारखान्याजवळ, शिरोळ) यांना अटक केली आहे.
दीपक मगदूम व सात संशयित यांच्यात पूर्वी भांडण झाले होते. हाच वाद मनात ठेवून परवेझ शेख याने दीपकला रविवारी पावणेबाराच्या सुमारास कुरुंदवाडला जायचे आहे, असे सांगून मोटारसायकलवरून शिरोळ नदीवेस रस्त्यावरील शेताजवळ नेले. परवेजने हातात दगड घेऊन दीपकच्या डोक्यात पहिला वार केला. दीपकसोबत असलेला मित्र अमोल सावंत याने परवेजला अडवण्याचा प्रयत्न केला असता, शेखने अमोलची गळपटी धरून मारहाण केली. पोलिस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. दीपकला मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले. सोमवारी त्याचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी पोलिस उपाधीक्षक डॉ. रोहिणी सोळंके यांनीही घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शीतल पालेकर करीत आहेत.
शेतात दबा धरून सर्व संशयितांनी दीपकला शेतात नेऊन दगडांनी बेदम मारहाण केली. रोहन कांबळे याने कोयत्याने हल्ला केला. नंतर सर्वजण घटनास्थळावरून पसार होताना, रोहन कांबळे याने कोयता अमोल सावंत यास दाखवून तुला पण जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली.